दुचाकी चोरी करणारे त्रिकुट अटकेत…

ठाणे – मुंबई ठाणे परिसरात मोटार सायकलची चोरी करून त्यांची भंगारमध्ये विल्हेवाट लावणाऱ्या तिघांना मुंब्रा पोलीसांनी अटक करून एकूण १२ मोटार सायकली जप्त करून एकूण ५ गुन्हे उघडकीस आणले. रकिब शब्बीर खान, रविंद्र लालजी सरोज, नादीर हुसेन अंसारी अशी या तिघांची नावे आहेत.

मुंब्रा पोलीस ठाण्याचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना १ इसम चोरीस गेलेली मोटार सायकल विक्री करण्याकरीता मुंब्रा बायपास, मुंबा टोलनाका येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून रकिब शब्बीर खान यास मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या ओळखीचा ठाणे येथील भंगारवाला रविंद्र लालजी सरोज याच्या सांगण्यावरून त्याचा साथीदार नादीर हुसेन अंसारी याच्यासह मिळून मोटार सायकल चोरीचे गुन्हे केले असून सदर मोटार सायकल भंगारवाला रविंद्र लालजी सरोज याला विकणार असल्याचे सांगितले.
पोलिसांनी रविंद्र लालजी सरोज, नादीर हुसेन अंसारी या दोघांना देखील अटक केली. तसेच एकूण १२ मोटार सायकली जप्त करून विविध पोलीस ठाण्यातील एकूण ५ गुन्हे उघडकीस आणले.