गुटखा सप्लाय करणारे अटकेत…

नवी मुंबई – महाराष्ट्र राज्यात गुटखा, पान मसाला सप्लाय करणाऱ्यांना ९९,७८,२६४/- रुपये किंमतीच्या मुद्देमालासह नवी मुंबई पोलिसांनी अटक केली.
तुर्भे पोलीसांना महापे चेक पोस्ट येथे नाकाबंदी दरम्यान चेकिंग करत असताना एका टेम्पोमध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत केलेला गुटखा पान मसाला मिळुन आला होता. सदर प्रकरणी पोलिसांनी ११,९६,८००/- रुपये किंमतीचा केसरयुक्त विमल पान मसाला गुटख्याच्या ३० मोठया गोण्या व ६,००,०००/- रुपये किंमतीचा टेम्पो असा १७,२६,८००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करून तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, सदर गुटखा हा डोंबिवली परिसरात राहणारे आरोपी हे गुजरात राज्यातून कंटेनरद्वारे गुटखा मागवून त्याची ठाणे, नवी मुंबई व रायगड परिसरात वितरण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी डोंबिवली परिसरातील ऑर्चिड क्राऊन, पलावा सिटी येथून गुटखा व पान मसाल्याने भरलेला १ टेम्पो आणि मानपाडा एमआयडीसी मधील पिंपळेश्वर मंदिर जवळून एक कंटेनर टेम्पो गुटखा व पान मसाल्यासह ताब्यात घेतला.
सदर प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक करून एकूण ९९,७८,२६४/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.