लग्नासाठी तगादा लावल्याने महिलेची हत्या…

नवी मुंबई – कोपरखैरणे परिसरात आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. लग्नाचा तगादा लावला म्हणून या महिलेची हत्या तिच्यासोबत प्रेमसंबंध असलेल्या वॉचमनने केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी वॉचमनला अटक केली आहे. राजकुमार बबूराम पाल असे याचे नाव आहे.
कांचनगंगा सोसायटीच्या विरुद्ध बाजूस असलेल्या नाल्यालगत खाडीकडे जाणाऱ्या अरुंद रोडच्या डाव्या बाजूच्या झाडाझुडपामध्ये एका तळ्यापासून १०० मि. अंतरावर कोपरखैरणे, नवी मुंबई येथे एका अनोळखी महिलेची अज्ञात व्यक्तीने तिच्या ओढणीने गळा आवळून हत्या करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह खाडीमध्ये ढकलून दिला असल्याबाबत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क. ६२ / २०२३ भादंवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात होता.
सदर गुन्हयाच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता सदर महिलेचे नाव सायदा बानू हासमी असे असून, ती जुईनगर येथे काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आणखी तपास करून राजकुमार बबूराम पाल यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता, सायदा बानू हासमी हिने लग्नाचा तगादा लावला म्हणून तिला खाडीकडे जाणाऱ्या रोडवरील झाडाझुडपामध्ये भेटण्यास बोलावून तिची हत्या केली असल्याचे त्याने सांगितले.