लाखो रूपयांची फसवणूक करणारी टोळी गजाआड…

ठाणे – विविध बँकांच्या एटीएम सेंटर मध्ये महीला व वयोवृध्द नागरीक, किशोरवयीन मुले यांना मदत करण्याचा बहाण्याने एटीएम कार्डाची अदला बदल करून लाखो रूपयांची फसवणूक करणाऱ्या ४ जणांच्या आंतरजिल्हा टोळीस खंडणी विरोधी पथकाने अटक करून ८ गुन्हे उघडकीस आणून विविध बँकेचे एकूण १०१ एटीएम कार्ड जप्त केले आहेत. सनी मुन्ना सिंग उर्फ सनी चिकना, श्रीकांत प्रकाश गोडबोले उर्फ श्री, हरीदास मोहन मगरे, उर्फ हन्या, रामराव उर्फ कचरू शेंडफड शिरसाठ अशी अटक कऱण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार महीला रुपाली बोचरे यांना नातेवाईकास ५०,०००/- रू. गुगल पे द्वारे पाठवायचे होते त्याकरीता सदरची रक्कम त्या एस.बी.आय. बँकेच्या रोड नं. २२ येथील एटीएम सेंटर मध्ये डीपॉझीट करण्यासाठी गेल्या असता तेथे हजर असलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांना एटीएम मध्ये पैसे भरत असताना मदत करण्याच्या बहाण्याने मार्गदर्शन करत असल्याचे भासवून त्यांचे पैसे भरुन झाल्यानंतर हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्डाची अदलाबदल करून सदर महीलेचे एटीएम कार्ड स्वतःकडे घेऊन त्यांना दुसऱ्याचे एटीएम कार्ड दिले. त्यांनतर तक्रारदार महीला पैसे भरणा करून निघून गेल्यानंतर सदर इसमाने तक्रारदार महीला पैसे भरणा करतेवेळी पाहीलेल्या पीन नंबरचा वापर करून त्याने बँक खात्यातून ३८,५००/- रुपये काढून त्यांची फसवबुक केली असल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे तिघांना पंढरपुर येथून आणि एकाला उल्हासनगर मधून अटक केली.
पोलिसांनी त्यांच्याकडून तक्रादार महिलेचे एटीएम कार्ड आणि इतरांचे विविध बँकांचे एटीएम कार्ड असे एकूण १०१ एटीएम कार्ड जप्त केले आहेत. तसेच त्यांच्याकडून फिर्यादी व इतर लोकांची फसवणूक करून मिळविलेल्या रक्कमेपैकी ७०,०००/- रू. रक्कम तसेच गुन्हा करण्याकरीता वापरलेले वाहन व इतर अशी एकूण ४,०६,२००/- रु.ची मालमत्ता हस्तगत केली आहे.