15 हजार रुपये दंड वसुली; तर 47 किलो प्लास्टिक जप्त…

ठाणे – ठाणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन प्रदूषण मंडळ यांनी संयुक्तरित्या (SUP) सिंगल युज प्लॅस्टिक कॅरी बॅग बंदीबाबत मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेतंर्गत सोमवारी कोपरी, उथळसर व खोपट परिसरात प्लास्टीक कॅरीबॅग बंदी कारवाई अंतर्गत शहरातील दुकानांमधील 47 किलो प्लास्टिक कॅरी बॅग जप्त करून 15 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेल्या आदेशानुसार सदरची कारवाई करण्यात आली आहे.
केंद्र शासनाने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळास सिंगल यूज प्लॅस्टिकबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व ठाणे महापालिकेच्यावतीने ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. एकदा वापर करुन टाकून देण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकमुळे पर्यावरणास हानी निर्माण होत आहे. यासाठी सिंगल यूज प्लॅस्टिकचा साठा करुन विक्री करणाऱ्या दुकानदारांवर तसेच सर्व आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे. सदर कारवाईची मोहिम ही ठाणे शहरात अधिक तीव्र स्वरुपात राबविली जाणार आहे.
सोमवार सकाळपासूनच ठाणे पूवेतील कोपरी परिसर, स्टेशन रोड, कोपरी मार्केट परिसरातून (SUP) सिंगल यूज प्लास्टीक बंदीच्या कारवाईस सुरूवात करण्यात आली. या कारवाईअंतर्गत दुकानांमधून 35 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून एकूण 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तर मंगळवारी उथळसर प्रभागसमितीअंतर्गत केलेल्या कारवाईमध्ये उथळसर मार्केट, व खोपट मार्केट परिसरातून 12 किलो प्लॅस्टिक कॅरी बॅग जप्त करुन 5 हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे.सदरची कारवाई ठाणे महानगरपालिकेचे वैज्ञानिक अधिकारी ओम परळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या प्रदुषण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली.
सदर सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून त्यानंतरही सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांवर 5 ते 25 हजारांची दंडात्मक कारवाई व कारावास अशा प्रकारची कारवाई होवू शकते. यासाठी दुकानदारांनी व नागरिकांनी सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.