८ कोटींच्या बनावट नोटा जप्त; दोघांना अटक…

ठाणे – तब्बल ८ कोटींच्या बनावट नोटा ठाणे शहर गुन्हे शाखा, घटक-५ पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच सदर प्रकरणी दोघांना अटक केली आहे. राम हरी शर्मा आणि राजेंद्र रघुनाथ राउत अशी या दोघांची नावे आहेत.

याबाबत वृत्त असे आहे कि, घोडबंदर रोड, गायमुख चौपाटी, जी.बी.रोड, ठाणे (पश्चिम) येथे दोन इसम बनावट भारतीय चलनी नोटा छापून विक्री करण्याकरीता कार मधून येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून राम हरी शर्मा आणि राजेंद्र रघुनाथ राउत या दोघांना कारसह ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ रू. २,०००/- दराच्या वेगवेगळ्या नंबरच्या नोटा असलेले एकूण ४०० बंडल एकूण रु. ८,00,00,000/- किं. (आठ कोटी) च्या बनावट भारतीय चलनी नोटा मिळुन आल्या.
त्यांच्याकडे चौकशी केली असता सदरच्या बनावट नोटा मदन चौव्हाण याच्या मदतीने पालघर येथील गोडाऊन येथे छापून त्या बनावट नोटा विक्री करण्याकरीता आले आहोत असे त्यांनी सांगितले. दरम्यान सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हयाचा अधिक तपास सुरु आहे.