डोंबिवली ‘ग’ प्रभागातील फेरीवाला पथक प्रमुख कादर रेवडी निलंबित…

DOMBIVALI – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) ‘ग’ प्रभागातील फेरीवाला हटाव पथकाचे प्रमुख कादर रेवडी यांना निलंबित करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी निलंबनाची कारवाई केली. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यात कसूर केल्याबाबत कादर रेवडी यांना निलंबित करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, अनधिकृत बांधकाम नियंत्रण व ग प्रभागाचे सहायक आयुक्त यांनी डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील १५० मीटर प्रतिबंधित ना-फेरीवाला क्षेत्रात पूर्वसूचना न देता खासगी वाहनाने पाहणी केली असता, मधुबन गल्ली परिसरात तसेच रेल्वे स्थानक परिसरात महापालिका कर्मचारी उपस्थित असतानाही मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. तसेच सदर पाहणीदरम्यान रेल्वे स्थानक परिसरातील नागरिक व प्रवाशांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे आढळून आले.

दरम्यान, याबाबत पथक प्रमुख कादर रेवडी यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांना समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही. त्यामुळे कर्तव्यपालनातील गंभीर कसूर, अनधिकृत फेरीवाल्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयश तसेच प्रशासकीय जबाबदारीच्या दृष्टीने गंभीर स्वरूपाची असल्याने याची चौकशी होणे गरजेचे असल्याकारणाने कादर रेवडी (पथक प्रमुख) यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.



