डोंबिवलीतील ‘फ’ प्रभागातील दोन बेकऱ्या सील…

DOMBIVALI – डोंबिवलीतील फ प्रभागातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन बेकऱ्या फ प्रभाग क्षेत्र कार्यालयाने सील केल्या आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वाढते हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याच मोहिमेअंतर्गत हि कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, फ प्रभाग हद्दीतील भोईरवाडीतील रूबीना बेकरी आणि त्रिमूर्तीनगर परिसरातील श्रीकृष्ण बेकरी या दोन बेकऱ्यांमध्ये दैनंदिन कामकाजासाठी मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर करून धूर आणि प्रदूषण केले जात असल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत दोन्ही बेकरीच्या चालकांना यापूर्वी वेळोवेळी नोटिसा बजावून हवा प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
मात्र नोटिसा देऊनही संबंधित चालकांनी कोणतीही उपाययोजना न केल्याने भोईरवाडी येथील रूबीना बेकरीचे चालक आसिफ खान आणि त्रिमूर्तीनगर येथील श्रीकृष्ण बेकरीचे चालक सुनील पडियार या दोघांच्या बेकऱ्या सील करण्यात आल्या.
हि कारवाई सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता निरीक्षक प्रमोद नारखडे, प्रशांत पुरी आणि मिलिंद गायकवाड यांच्या पथकाने केली.



