एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक…

dombivali – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्सला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. रमेश म्हात्रे यांच्या सह चौघांना विष्णुनगर पोलिसांनी अटक केली असून, त्यांना कल्याण कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर या चौघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मारहाणीच्या प्रकरणानंतर सर्वच स्तरातून तीव्र विरोध होत होता. विधिमंडळात याचे पडसाद उमटले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील रमेश म्हात्रेंवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. अखेर विष्णुनगर पोलिसांनी रमेश म्हात्रे यांना अटक केली. त्याअगोदर पोलिसांनी तिघांना अटक केली होती.

प्रकरण काय आहे?
डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिला रुग्णाच्या नवजात बाळाला उपचारासाठी NICU बेडची गरज होती. रुग्णालयातील सर्व बेड पूर्ण भरले होते. ऑन-ड्यूटी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव साळुंखे यांनी या बाळाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. यावरून रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि आरोपींनी डॉक्टरांशी वाद घालत त्यांना मारहाण केली.



