नसरापूरचा नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा…

pune – पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या करणाऱ्या ६५ वर्षीय नराधम भीमराव प्रभाकर कांबळे याला आज (सोमवार, ता २९) पुणे विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.
विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने मागे गुरुवारी (दि. २५) झालेल्या सुनावणीत कांबळेला या प्रकरणात दोषी ठरविले होते. मात्र, शिक्षेचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. आज त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

न्यायालयाने ही केस दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचंही स्पष्ट केलं. या निकालाचं वाचन करताना न्यायालयाने पीडिता स्वरक्षणासाठी असमर्थ होती का याचाही विचार यावेळी केला. शिवाय अशा कट रचून हत्या आणि बलात्कार केला असेल तर या गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. समाजावर घटनेचे दूरगामी परिणाम करणाऱ्या घटनांमध्येही फाशीचीच तरतूद असल्याचं निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. शिवाय आरोपीला फाशीची शिक्षासुद्धा कमी आहे, असंही न्यायाधीश यावेळी म्हणाले.
काय आहे प्रकरण?
1 मे 2026 रोजी आरोपीने हा गुन्हा केला होता. आरोपीने खाऊ देण्याच्या बहाण्याने साडेतीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या केली होती आणि त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवला होता. याचे सीसीटीव्ही फुटेज देखील पुढे आले. ज्यात आरोपी भीमराव कांबळे हा चिमुकलीला हाताल धरून घेऊन जाताना स्पष्ट दिसले. सीसीटीव्ही आधारे आरोपी भीमराव कांबळे याला पकडण्यात आले होते.
दरम्यान, अत्याचार आणि खून खटल्यात सर्वात जलदगतीने निकाली लागलेला हा राज्यातील पहिलाच खटला ठरला आहे.



