thane : ३९ कोटींचे अंमली पदार्थ नष्ट…

thane – जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधत ठाणे पोलीस आयुक्तालयाने ड्रग्ज माफियांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई करत तब्बल ३९ कोटी ३ लाख ४८ हजार ४०० रुपये किमतीचा आणि सुमारे ६०० किलो वजनाचा अंमली पदार्थांचा जप्त केलेला साठा कायदेशीर प्रक्रियेनंतर नष्ट केला. विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले गांजा, एम.डी. (मेफेड्रोन), चरस, ब्राऊन शुगर तसेच मोठ्या प्रमाणावरील कफ सिरपचा साठा नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसी परिसरातील अधिकृत प्रकल्पात शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आला.
केंद्र सरकारच्या ”नशामुक्त भारत अभियान” अंतर्गत देशभरात अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई केली जात असताना, ठाणे पोलीस आयुक्तालयानेही या मोहिमेला अधिक बळ देत ही विशेष कारवाई राबवली. ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस ठाण्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आवश्यक न्यायालयीन व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसी येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीमध्ये वैज्ञानिक पद्धतीने नष्ट करण्यात आला.
ही संपूर्ण प्रक्रिया केंद्रीय मुद्देमाल नाश समितीच्या देखरेखीखाली पार पडली. समितीचे अध्यक्ष तथा पोलीस सहआयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, समितीचे सदस्य तथा पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, पोलीस उपायुक्त (मुख्यालय-१) मीना मकवाना तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या उपस्थितीत या कारवाईची अंमलबजावणी करण्यात आली. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या ११२ गंभीर गुन्ह्यांमधून जप्त करण्यात आलेला हा मुद्देमाल होता.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे आणि त्यांच्या विशेष पथकाने सर्व कायदेशीर प्रक्रिया, न्यायालयीन परवानग्या, नमुना तपासणी तसेच तांत्रिक सोपस्कार पूर्ण करून कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांचा कायमचा नायनाट केला.
या कारवाईत सर्वाधिक प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला होता. ६६ गुन्ह्यांमधील ५६४ किलो ६७४ ग्रॅम गांजा, ज्याची किंमत १ कोटी १३ लाख ५ हजार रुपये होती, तो नष्ट करण्यात आला. याशिवाय २ गुन्ह्यांमधील ८५५ ग्रॅम हायब्रिड गांजा, ज्याची किंमत ८५ लाख ५० हजार रुपये होती, त्याचाही समावेश होता.
सर्वाधिक आर्थिक मूल्य असलेला मुद्देमाल म्हणजे एम.डी. (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ होता. २९ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले ६ किलो ७१५ ग्रॅम एम.डी., ज्याची बाजारभावानुसार किंमत १३ कोटी ४३ लाख रुपये होती, तो नष्ट करण्यात आला. तसेच ७ गुन्ह्यांमधील २० किलो ९८२ ग्रॅम चरस, ज्याची किंमत तब्बल २० कोटी ९८ लाख २० हजार रुपये होती, तोही पूर्णपणे नष्ट करण्यात आला.
याशिवाय १ गुन्ह्यातील १०४ ग्रॅम ब्राऊन शुगर, ज्याची किंमत २० लाख ८० हजार रुपये होती, तसेच ७ गुन्ह्यांमधील १,४६७ कफ सिरपच्या बाटल्या, ज्यांची किंमत २ लाख ९३ हजार ४०० रुपये होती, त्यांचाही समावेश या कारवाईत होता. एकूण ५९४ किलो ३३२ ग्रॅम अंमली पदार्थ आणि १,४६७ कफ सिरपच्या बाटल्या अशा तब्बल ३९ कोटींपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल एकाच वेळी नष्ट केला.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण झाली. या मोहिमेत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्यासह परिमंडळीय नोडल अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, चंद्रहास गोडसे, जयपाल राजपूत, संदीप धांडे, संजय दवणे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर-पाटील, पोलीस उपनिरीक्षक दीपक डुम्मलवाड, राजेंद्र निकम, मोहन परब आणि सहाय्यक रासायनिक विश्लेषक यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यासोबतच पोलीस हवालदार हरीश तावडे, अभिजीत मोरे, अमोल पवार, संदीप चव्हाण, नंदकिशोर सोनगिरे, हुसेन तडवी, अमोल देसाई, अमित सकपाळ, अजय सकपाळ, गिरीश पाटील, अनुप राक्षे, शिल्पा कसबे आणि कोमल लादे यांच्यासह संपूर्ण पोलीस पथकाच्या अहोरात्र मेहनतीमुळे ही यशस्वी जप्ती व विल्हेवाटीची कारवाई पूर्ण झाली.



