भिवंडीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई…

thane – परराज्यातून होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. भिवंडी येथील मुंबई – नाशिक हायवेवरील वडपे गावच्या कमानी समोर सापळा रचून तब्बल १ कोटी ९० लाख ३५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्याचा साठा आणि एक ६ चाकी कंटेनर ट्रक समाविष्ट आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, गोवा राज्यातून बेकायदेशीररित्या विदेशी मद्याची वाहतूक केली जात होती. त्यानुसार भिवंडी विभाग ठाणे-२ च्या पथकाने वडपे गावाजवळ पाळत ठेवून संशयित कंटेनर थांबवला. त्या वाहनाची झडती घेतली असता, त्यात गोव्यातील नामांकित मद्याच्या तब्बल ७७,७६० सीलबंद बाटल्या (१,६२० बॉक्स) आढळून आल्या. याबाबत हनुमान मोबता राम याला अटक करण्यात आली आहे.
जप्त केलेल्या मुद्देमालमध्ये विदेशी मद्याच्या ७७,७६० सीलबंद बाटल्या त्याची किंमत १ कोटी ६३ लाख २९ हजार ६०० रुपये, अशोक लेलँड कंपनीचे ६ चाकी कंटेनर किंमत २७ लाख रुपये आणि एक मोबाईल त्याची किंमत किंमत ६ हजार रुपये यांचा समावेश आहे.



