मुंबई

कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना दिलासा…

mumbai – कोकण विभागातील अवकाळी पाऊस व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) अंतर्गत सुमारे २०९ कोटी रुपयांची, त्याचप्रमाणे हवामान आधारित पीक विमा योजनेंतर्गतची मदत १५ दिवसांच्या आत वितरित करण्यात येईल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य निलेश राणे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भरणे म्हणाले की, कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांच्या नुकसानीची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

एनडीआरएफच्या निकषांनुसार हेक्टरी सुमारे २२ हजार ५०० रुपये मदत देण्यात येणार असून कोकण विभागातील बाधित शेतकऱ्यांसाठी २०९ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव सादर केला आहे. ही मदत लवकरात लवकर वितरित करण्यात येणार आहे. जिल्हानिहाय मदतीचा तपशील देताना ठाणे जिल्ह्यातील ४ हजार ६६९ शेतकऱ्यांना ४ कोटी ८४ लाख रुपये, पालघर जिल्ह्यातील १७ हजार ७१२ शेतकऱ्यांना ६ कोटी ८३ लाख रुपये, रायगड जिल्ह्यातील सुमारे १७ हजार शेतकऱ्यांना २० कोटी २८ लाख रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील ५२ हजार ६२८ शेतकऱ्यांसाठी ९८ कोटी ४५ लाख रुपये, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४२ हजार ३२२ शेतकऱ्यांसाठी ७९ कोटी ५ लाख रुपयांची मदत प्रस्तावित करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

याशिवाय हवामान आधारित पीक विमा योजनेंतर्गत आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे २१७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे. एनडीआरएफमधील मदत तसेच पीक विमा योजनेंतर्गत मंजूर नुकसानभरपाई या दोन्ही रकमा १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी शासन आवश्यक कार्यवाही करीत असल्याचे मंत्री भरणे यांनी स्पष्ट केले. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य शेखर निकम यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page