ताल बार अँड रेस्टॉरंटवर धाड; २८ जणांवर गुन्हा; ६ जणांना अटक…

kalyan – कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ताल बार अँड रेस्टॉरंटवर पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०३ यांचे विशेष पथकाने छापा टाकला. यात १५ बारबालासह एकूण २८ लोकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हददीतील ताल बार येथे नियमापेक्षा जास्त बारबाला असून, त्या अश्लील नृत्य करत असल्याबाबतची माहिती पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०३ यांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, त्याठिकाणी हॉलमध्ये एकूण १५ बारबाला मिळून आल्या आणि सदर बारचे मालक, चालक, मॅनेजर, कॅशियर, पुरूष वेटर, ग्राहक असे एकूण १३ लोक हे त्यांना प्रोत्साहीत करत असल्याचे दिसून आल्याने त्यांच्याविरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ताल बारचे मालक, चालक, मॅनेजर, कॅशियर अशा एकूण ६ जणांना गुन्हयात अटक करण्यात आली आहे. पुढील तपास महात्मा फुले चौक पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची यशस्वी कामगिरी परिमंडळ ३ कल्याण विशेष कारवाई पथकानी केली असून, अशा प्रकारे परिमंडळ ३ कल्याण मध्ये नियमभंग व अटी शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या लेडीज बार विरूध्द कारवाई सुरू राहणार आहे.



