केडीएमसी हद्दीत ८० ते ९० हजार भटके कुत्रे…

kalyan – कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत ८० ते ९० हजार भटकी कुत्री असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या तीन वर्षात केवळ ४८,४७३ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. एका माहिती अधिकारातून हि बाब उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पशुसंवर्धन विभागाच्या अलिकडच्या गणनेनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत अंदाजे ८० ते ९० हजार भटके कुत्रे आहेत. गेल्या तीन वर्षात ४८, ४७३ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. तसेच ५१०५२ लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावले आहे. तर रेबीजची लागण झालेल्या कुत्र्यांनी चावलेल्या लोकांची संख्या ११७६ इतकी आहे.

दरम्यान, मार्च २०२२ ते मार्च २०२३ मध्ये १,५१,६४,३३७ रूपये, एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ मध्ये १, ४१, ६२, ४८० रुपये, तर एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ मध्ये १,३०, ५७,७६७ रुपये इतका खर्च लसीकरण, निर्बिजीकरण याच्यावर करण्यात आला आहे. अशीही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, डोंबिवलीत ‘ह’ प्रभाग क्षेत्र डोंबिवली पश्चिम, मोठागाव, डोंबिवली पूर्व , नांदिवली, pnt कॉलनी, पांडुरंग वाडी, दत्त नगर, ‘ग’ प्रभाग क्षेत्र, पी.पी.चेम्बर, मानपाडा रोड, पेंडसे नगर, टिळक चौक, ‘फ’ प्रभाग क्षेत्र, गजानन चौक, घरडा सर्कल, सागर्ली, पाथर्ली, ई प्रभाग क्षेत्र आणि कल्याण पूर्व – पश्चिम अशा ठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रात्री अपरात्री हे कुत्रे गाडीवरून येणाऱ्या – जाणाऱ्या तसेच चालत येणाऱ्या – जाणाऱ्या लोकांच्या अंगावर धावतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. दिवसाही सुद्धा हि कुत्रे लोकांच्या पाठी लागतात. त्यामुळे लोकांच्या मनात एक प्रकारे भीती निर्माण झाली आहे. रस्त्याने काही वयोवृद्ध, लहान मुलं, शाळेत येणारी जाणारी मुले ये जा करत असतात. त्यांच्या देखील जीविताला या कुत्र्यामुळे धोका निर्माण झाला आहे.
परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत असणाऱ्या कुत्र्यांची संख्या पाहता. महानगरपालिकेने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त कुत्र्यांची निर्बिजीकरण करणे आवश्यक आहे. किंबहुना भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला पाहिजे. तरच लोकांना कुत्र्यांचा होणारा त्रास कमी होईल.