डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयावर भीक मांगो मोर्चा…

dombivali – डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयावर भीक मांगो मोर्चा काढण्यात आला. काही दिवसांपूर्वी सर्पदंशामुळे एका चार वर्षाच्या मुलीसह तिच्या मावशीचा मृत्यू झाला होता. त्यावेळी या दोघींना डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु रुग्णालयात व्यवस्थित उपचार न मिळाल्याने या दोन्ही मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत मुलींच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच मृत्यूला जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी देखील या मृत मुलींच्या नातेवाईकांनी केली आहे.
याच पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील द्वारका हॉटेलपासून ते शास्त्रीनगर रुग्णालयापर्यंत ठाकरे गट, मनसे, काँग्रेस असे विविध पक्ष, मृत मुलींचे नातेवाईक आणि नागरिकांनी भीक मांगो मोर्चा काढला. त्यावेळी रुग्णालयाच्या परिसरात ठिय्या देण्यात आला. जोरदार घोषणा देण्यात आल्या. भीक द्या, भीक द्या… केडीएमसी आयुक्तांना भीक द्या, खासदार आणि आमदार यांच्याकडून नको दांडिया, नको गरबा, आम्हाला हवी आरोग्य सेवा आदी घोषणांनी शास्त्रीनगर रुग्णालय परिसर दणाणून सोडला.
दरम्यान, डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णलयात वारंवार अशा घटना घडत आहेत. कधी गरोदर माता, तर कधी जन्माला आलेले बाळ, जन्मदाती आई, तर कधी सुविधांचा अभाव, एखादया गंभीर स्वरूपाचा आजार असेल तर या रुग्णालयात आवश्यक ते उपचार उपलब्ध नाहीत, इमर्जन्सी असेल तर काहीवेळेला तर डॉक्टरही उपस्थित नसतात. इतक्या मोठ्या रुग्णालयात केवळ सर्दी आणि खोकल्याचे उपचार होतात. अत्यंत भयंकर परिस्थिती या रुग्णालयाची आहे.
एखादी गंभीर घटना घडली तर कोणतीही ताबडतोब कारवाई होताना दिसत नाही. केवळ चौकशी करू, कारवाई करू अशी उत्तर मिळतात. परंतु नंतर त्या चॊकशीचे आणि कारवाईचे काय होते हे कोणालाच कळत नाही. ठोस अशी कारवाई होत नाही. त्यामुळे या रुग्णालयात कोणतीही शिस्त नाही आणि यांना लोकांच्या जीवाची पर्वा नाही असेच या घटनेवरून दिसून येते. कर्मचारी कामावर दारू पिऊन येणे, गैरहजर असणे, काहीवेळेला तर डॉक्टरर्सहि गैरहजर असतात.
डोंबिवलीतील स्थानिक खासदार, आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे देखील या गंभीर विषयांकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. खरंतर तर त्यांनी या प्रश्नांमध्ये लक्ष घालून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवल्या पाहिजेत. वर्षानुवर्षे या महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी बजेट सादर होते परंतु त्याप्रमाणे नागरिकांना कोणतीही आरोग्य सुविधा मिळताना दिसत नाहीत. अजून किती जीव गेल्यानंतर महापालिका प्रशासन जागे होणार आहे काय माहित?