जबरी चोरी करणाऱ्यास मालमत्ता गुन्हे कक्षाने केली अटक…

thane – जबरी चोरी करणाऱ्या एकास ठाणे मालमत्ता गुन्हे कक्षाने अटक केली आहे. ख्वाजा गफुर शेख असे याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून जबरी चोरी केलेले १३००/- रु. हस्तगत केले आहेत.
कल्याण महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील एका दाखल गुन्ह्यातील आरोपी जबरी चोरी करून तो मुंब्रा रेतीबंदर परिसरात लपूनछपून फिरत असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे कक्षाचे पोलीस नाईक सचिन वानखेडे यांना मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा रेतीबंदर परिसरात सापळा रचून ख्वाजा गफुर शेख याला १३००/- रु. रोख रक्कमेसह अटक केली.
सदर रक्कमेबाबत ख्वाजा गफुर शेख यांच्याजवळ चौकशी केली असता त्याने कल्याण पश्चिमेतील भिवंडी बस स्टॉप जवळ एका महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्याकडून जबरदस्तीने अडीच हजार रुपये काढून घेतले त्यातील काही रक्कम खर्च झाली असून, सदरचे १३००/- रुपये त्यामधून शिल्लक राहिले असल्याचे सांगितले.
दरम्यान, ख्वाजा गफुर शेख या सराईत गुन्हेगारावर यापूर्वी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे ५ गुन्हे आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा १ गुन्हा दाखल आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पंजाबराव ऊगले अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे शहर, अमरसिंह जाधव पोलीस उप आयुक्त गुन्हे, विनय घोरपडे सहा पोलीस आयुक्त (शोध २) यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्ष ठाणे शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे, पोउनि भिसे, सहाउपनिरीक्षक गायकवाड, पोलीस नाईक सचिन वानखेडे, पोलीस शिपाई महेश सावंत, पोलीस हवालदार वसंत चौरे, पोलीस हवालदार कुंभारे, पोलीस हवालदार अनुप कामत यांनी केली आहे.