रेव्ह पार्टी, अंमली पदार्थ आणि तरुणाईचे समाज स्वास्थ्य…

रेव्ह पार्टी सारख्या दृश्यांचे चित्रीकरण आपण ८०, ९० च्या दशकातील हिंदी चित्रपटात अनेकदा पाहिले आहे.
अंमली पदार्थाची तस्करी, त्याचा व्यापार आणि रेव्ह पार्टी या गोष्टी हिंदी चित्रपटात सहज दाखवल्या जायच्या. अशा पार्ट्या उच्चभ्रू लोकांमध्ये होत असतात असे आपल्याला त्यामुळे समजून यायचे. परंतु आजकाल या पार्ट्यांचे प्रमाण जास्त वाढले आहे. आज या पार्ट्या सर्वसामान्य नोकरदार वर्गापर्यंत पोहोचल्या आहेत.
कॉल सेंटर, आयटी कंपनीत काम करणारे तरुण, तरुणी कामाच्या तणावमुक्तीसाठी अशा पार्ट्यांचा आधार घेत आहेत. रेव्ह पार्ट्यांचे वाढत जाणारे प्रमाण फार धोकादायक आहे. असे पोलीस अधिकारी, जाणकार सांगत असतात तरी समाजात कुठे ना कुठे छुप्या पद्धतीने अशा रेव्ह पार्ट्या होत असतात. आपले महाराष्ट्र पोलीस सतर्क असल्यामुळे अनेकदा अशा रेव्ह पार्ट्यांवर धाडी पडल्या आहेत.
यात उद्योगपती, चित्रपट कलाकार, राजकीय कार्यकर्ते, बारबाला, कॉलेज वयातील तरुण मुलं मुली या सर्वांचा समावेश ह्या प्रकारच्या रेव्ह पार्ट्यांमध्ये असतो. तसेच अशा पार्ट्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक अंमली पदार्थ मिळून येतात. अशा पार्ट्यांमध्ये ५० पेक्षा अधिक लोकांची संख्या असते. कधी कधी दोनशे तीनशे लोक ही या पार्ट्यांमध्ये असतात असे काही ठिकाणी निष्पन्न झाले आहे.
अशा पार्ट्यांमध्ये मद्यपदार्थमध्ये काही अंमली पदार्थ मिसळून संगीत, नृत्यासकट हे पेय पिले जाते. हुक्का, सिगारेट यांचा वापर करूनही काही अंमली पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामध्ये तरुण-तरुणी आपले देहभान विसरून नाचतात, गातात काही करायला तयार होतात. अशा प्रकारची नशा घेतल्यावर बुद्धीवरचे नियंत्रण सुटते. त्यामुळे तरुण तरुणी हवं ते करतात, त्यांना काहीच लाज उरत नाही. कारण त्यांच्या मानसिकतेवर अंमली पदार्थांचा प्रभाव त्या काही तासात कायम असतो. त्यामुळे अशा पार्ट्या दानवी पद्धतीच्या होऊन जातात. शारीरिक संबंध, ब्लॅकमेलिंग, चोरी, हत्या अशी प्रकरणे या पार्ट्यांमधून घडून येतात.
पोलीस अशा प्रकारच्या रेव्ह पार्ट्यांवर धाडी टाकतात तेव्हा त्यांना त्याठिकाणी नको त्या अवस्थेत लोक सापडतात. आणि अशा अवस्थेत पोलिसांना त्या लोकांना पोलीस स्टेशनला घेऊन जावे लागते.
रेव्ह पार्ट्या छुप्या पद्धतीने महाराष्ट्रात होत आहेत. मुंबई, ठाणे, पुणे या सांस्कृतिक शहरांमध्ये अशा पार्ट्या सर्रास होत आहेत. याचा परिणाम तरुणांचे समाज स्वास्थ्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
तसेच केवळ पार्ट्यांमधूनच नाही तर आजकाल अंमली पदार्थ सहजपणे उपलब्ध होत आहेत. अशा जीवघेण्या जीवन उद्धवस्थ करणाऱ्या अंमली पदार्थाच्या जाळ्यात केवळ तरुण पिढीचं नाही तर शाळेत जाणारे विद्यार्थी देखील अडकत आहेत. हायस्कूल, कॉलेज परिसरात अंमली पदार्थ सहज मिळू लागले आहेत. त्यामुळे गावातली, शहरातली तरुण, विद्यार्थी अंमली पदार्थाच्या व्यसनाला बळी पडू लागली आहेत, हे व्यसन दारूपेक्षा भयंकर आहे. या अंमली पदार्थाची नशा एकदा माणसाला लागली तर त्यातून त्यांना बाहेर पडता येत नाही. मग यातून अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी चोरी, मारामारी, पालकांना ब्लॅकमेल करणे, लुबाडणे यासारखे प्रकार होत आहेत.
राज्यात अंमली पदार्थ विरोधी कायदा सक्त आहे. पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी सुद्धा वेळोवेळी होत आहे. तरीही अंमली पदार्थाच्या विळख्यातून तरुण पिढी काही बाहेर पडत नाहीये. खरंतर या अंमली पदार्थांविरोधात जागोजागी जनजागृती मोहीम राबवली गेली पाहिजे. शासनाने शाळा, कॉलेज, वसतिगृह याठिकाणी जाऊन नशामुक्तीसाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. तरच अशा गोष्टींना आळा बसेल. पालकांनी देखील आपल्या मुलांशी याबाबत मोकळेपणाने बोलले पाहिजे. पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई आणखी कडक केली पाहिजे. तसेच रेव्ह पार्टी असो कि आणखी कोणती पार्टी असो ज्या पार्टीत दारू, सिगरेट, अंमली पदार्थ, नशेच्या वस्तू, हुक्का अशा कोणत्याही गोष्टी आढळल्या तर संबंधितांवर कडक कारवाई करून त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे. मग त्या पार्टीत कोणीही असो. कोणालाही पाठिशी घालता काम नये.