दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई…

thane – मुंब्रा खाडी परिसरात रेल्वे पुलालगत अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला प्राप्त झाली. त्यानुषंगाने ठाणे उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील तसेच ठाणे तहसिलदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दि.25 मे 2025 रोजी मुंब्रा ते कल्याण दरम्यान रेल्वे ट्रॅकजवळील खाडी परिसरात गस्त घालण्याची कार्यवाही राबविली.
या गस्त दरम्यान दिवा खाडीमध्ये एक बोट (बार्ज) आणि सक्शन पंपच्या सहाय्याने अवैध रेती उत्खनन होत असल्याचे आढळून आले. महसूल विभागाच्या पथकाने तत्काळ हस्तक्षेप करीत बार्ज व सक्शन पंप खाडीमध्येच बुडवून नष्ट केले. नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत ५० लाख रुपये इतकी आहे.
या कारवाईमुळे खाडी परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर आळा बसणार असून पुढील काळातही अशी कारवाई सातत्याने सुरू ठेवली जाणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
या कारवाईत बाळकुम मंडळ अधिकारी शशिकांत जगताप व त्यांचे सर्व ग्राम महसूल अधिकारीही सहभागी झाले होते.