दारू पिण्यास पैसे न दिल्याने मारहाण; ५ जणांना अटक…

kalyan – दारू पिण्यास पैसे न दिल्याने मारहाण केल्याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. गुलाम सुभानी शेख उर्फ मुन्ना, अब्दुल रहेमान गुलाम सुभानी शेख, शोएब रहिम शेख, अजिज इब्राहिम शेख, शाहिद युसुफ शेख अशी यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महात्मा फुले चौक पो. स्टे. हद्दीत राहणारे फिर्यादी निसार सैय्यद नजीर सैय्यद हे घरी होते त्यावेळी गुलाम सुभानी शेख उर्फ मुन्ना यांनी त्यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावेळी निसार यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर गुलाम यांनी याबाबत आपला मुलगा अब्दुल याला सांगितले असता, अब्दुल आणि इतर तिघांनी मिळून निसार यांना ठोशा बुक्यांनी मारहाण केली. दरम्यान, निसार यांची पत्नी व मुलगी सानिया या निसार यांना सोडविण्यासाठी गेल्या असता आरोपींची लाकडी दांडक्यांनी निसार, त्यांची पत्नी व मुलगी यांना मारहाण केली. आणि या मारहाणीत सानिया हिच्या डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाला असल्याबाबत महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून १) गुलाम सुभानी शेख उर्फ मुन्ना २) अब्दुल रहेमान गुलाम सुभानी शेख ३) शोएब रहिम शेख ४) अजिज इब्राहिम शेख ५) शाहिद युसुफ शेख यांना अटक केली.
सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३, अतुल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, कल्याण विभाग, कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि ज्ञानेश्वर साबळे, पोनि (गुन्हे) नाईक, पोनि (प्रशासन) नांगरे यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी/अंमलदार यांच्या मदतीने केली आहे.