डोंबिवलीतील महिलेच्या मृत्यू प्रकरणी दोन चौकशी समित्या…

dombivali – कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक, पालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त यांच्या दोन स्वतंत्र चौकशी समित्या नेमण्यात आल्या आहेत. या दोन्ही चौकशी समित्यांच्या अहवालाप्रमाणे महिलेच्या मृत्यू प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, असे पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी सांगितले.
दरम्यान, रुग्णालयाच्या आश्वासनानंतर मृत महिलेच्या कुटुंबियांनी आंदोलन मागे घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, प्रसूतीनंतर सुवर्णा सरोदे हिचा झालेला मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असून, संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत नातेवाईकांनी शास्त्रीनगर रुग्णालयाच्या परिसरात ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर राजकीय पक्ष, नातेवाईक यांनी याबाबत रुग्णालय प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत चौकशीचे आश्वासन देण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी देखील शास्त्री नगर रुग्णालयात अशीच एक गंभीर बाब समोर आली होती दावडी येथे राहणारी प्रिया शर्मा ही गरोदर असल्याने तिने प्रसूतीकरीता ३ महिन्यापूर्वीच डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णलायात नाव नोंदणी केली होती. तिला प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्याने तिच्या वडिलांनी तिला शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. तिची चाचणी केली गेली. तिची प्रकृती प्रसूतीसाठी योग्य नसल्याने तिची प्रसूती करणे योग्य ठरणार नाही. असे सांगत तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील शीव रुग्णलायत न्या असे सांगितले. तिच्या वडिलांनी मुलीला प्रसूतीकरीता मुंबईतील शीव रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी तिची प्रसूती विना शस्त्रक्रिया नैसर्गिकरित्या झाली. तिची प्रकृती गंभीर नसल्याची रुग्णालयातील डॉक्टरांनी अशा प्रकारे थाप मारल्याची बाब या घटनेतून उघड झाली होती. परंतु कारवाईची मागणी जोर धरल्यानंतर संबंधित डॉक्टरांना रुग्णालय प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.
त्यामुळे शास्त्री नगर रुग्णालयात वारंवार घडणाऱ्या अशा घटनेतून रुग्णालय प्रशासन गरोदर महिला आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाच्या जीवाशी खेळ करत आहेत का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.