भिवंडी महापालिकेचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…
thane – अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चार मधील दोन अधिकाऱ्यांना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून, याप्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक आयुक्त सुनील भोईर आणि प्रभारी बीट निरीक्षक अमोल वारघडे अशी या लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे चार मजली बांधकाम असून सदर बांधकाम हे अनधिकृत असल्याबाबत सुनील भोईर, सहाय्यक आयुक्त, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका यांनी निर्णयाद्वारे सुचित केले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी भोईर यांची भेट घेतली असता, भोईर यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे रु. १,५०,०००/- लाचेची मागणी केली. पंरतु तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत ला.प्र.वि. मुंबई येथे तक्रार दिली.
एसीबीने सदर तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता, भोईर यांनी तक्रारदार यांच्याकडे अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्याकरीता तडजोडीअंती रु. १,३०,०००/- लाचेची मागणी करून त्यातील पहिला हप्ता म्हणून रु. ५०,०००/- स्विकारण्याचे कबूल केल्याचे निष्पन्न झाले.
त्याप्रमाणे एसीबीने सापळा रचून प्रभारी बीट निरीक्षक अमोल वारघडे यांना सहायक आयुक्त सुनील भोईर यांच्या सांगण्यावरून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम रू. ५०,०००/- स्विकारताना रंगेहाथ पकडले. तसेच याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.