रिक्षात विसरलेले दागिने परत मिळवून दिले…
dombivali – एक महिला सोन्याचे दागिने असलेली बॅग रिक्षात विसरली होती. ती बॅग टिळक नगर पोलिसांनी परत मिळवून दिली आहे. या बॅगेत सोन्याचा मणिहार, सोनसाखळी, बांगड्या, अंगठ्या, रिंगा असा एकूण १२ लाख ९५ हजाराचा ऐवज होता.
मिळालेल्या माहितीनुसार, हि महिला घाटकोपर ते डोंबिवली असा रिक्षेने प्रवास करत होती. डोंबिवलीत उतरल्यावर महिला हि बॅग रिक्षात विसरली. दरम्यान, घरी गेल्यानंतर या महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने तात्काळ टिळक नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांना सांगितला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे रिक्षा चालकाचा शोध घेऊन त्याला ऐरोली चिंचपाडा भागातून ताब्यात घेतले. त्यानंतर सदर रिक्षाचालकाने रिक्षात विसरलेली महिलेची दागिन्यांची बॅग पोलिसांना परत दिली. आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या उपस्थितीत तो ऐवज महिलेच्या स्वाधीन करण्यात आला.