कल्याण – अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा अन्यथा…

पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आदेश…
ठाणे – जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामे आहेत त्या परिस्थितीत तात्काळ थांबवावीत, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, असे आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.

जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत विविध शासकीय यंत्रणांचा आढावा पालकमंत्री देसाई यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी ठाणे जिल्ह्यातील वाढत्या अनधिकृत बांधकामाविषयी चिंता व्यक्त केली. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार गणपत गायकवाड यांनी देखील या अनधिकृत बांधकामांबाबत नाराजी व्यक्त केली. याची दखल घेत शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी, सर्व महापालिका आयुक्त, प्रांताधिकारी व तहसिलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सुरु असलेली अनधिकृत बांधकामे आहेत त्या परिस्थितीत तात्काळ थांबवावीत, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, असे आदेश दिले. तसेच शहरातील अनधिकृत बांधकामे व रेरा संदर्भातील सर्व प्रलंबित प्रकरणांवर योग्य कार्यवाही करावी अन्यथा संबंधित आयुक्तांना दोषी ठरवण्यात येईल. जिल्ह्यात यापुढे कोणत्याही महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे आढळून आले तर महापालिका आयुक्तांना सर्वस्वी जबाबदार ठरवून त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील देसाई यांनी दिला.

दरम्यान, केडीएमसी महापालिका हद्दीतील काही प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचे जाळे पसरले आहे. अनधिकृत बांधकामासंदर्भात संबंधित व्यक्तींना केवळ नोटीस देण्यात येते, मात्र या अनधिकृत बांधकामांवर ठोस कारवाई केली जात नाही. M.R.T.P कायदा अंतर्गत देखील गुन्हे दाखल होतात पण संबंधित अनधिकृत इमारती निष्कासित केल्या जात नाहीत. तेव्हा आता केडीएमसी आयुक्त दांगडे या इमारती निष्कासित करतील का? असा प्रश्न कल्याण डोंबिवलीकरांना पडला आहे.