देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा – सुप्रीम कोर्ट…
नवी दिल्ली – तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहे. सुप्रीम कोर्टाने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले आहे. लाडू प्रसाद तपासाचा निकाल लागण्याआधीच माध्यमांमध्ये निवेदन देण्याची काय गरज होती ? असा प्रश्न कोर्टाने उपस्थित केला आहे.
तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रसाद (लाडू) बनवताना प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. त्यावेळी देवाला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे असं मत कोर्टाने व्यक्त केलं आहे.
अहवाल पाहता प्रथमदर्शनी असे दिसते की प्रसाद बनवताना भेसळयुक्त सामग्री वापरली गेली नव्हती. SIT ने कुठपर्यंत तपास केला ? मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावं असं ही कोर्टाने म्हटले आहे. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून जबाबदारीची अपेक्षा असते. अहवाल जुलैमध्ये आला मग सप्टेंबर महिन्यात त्यावर भाष्य का ? असा प्रश्न कोर्टाने उपस्थित केला.