मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला…
sindhudurd – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा ३५ फुटांचा होता. पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मालवणमधील तारकर्लीच्या समुद्रकिनारी नौदल दिनाच्या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जातात. भारतीय नौदलाने देखील आपल्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा छापली आहे.
या पार्श्वभूमीवर नौदलाच्या वतीने ४ डिसेंबर २०२३ चा नौदल दिन छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निमित्ताने राजकोट किल्ल्यावर नौदल आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाला होता.