कल्याणमधील सहजानंद चौकात होर्डिंग कोसळलं…
कल्याण – कल्याण पश्चिमेतील सदानंद चौकात होर्डिंग कोसळलं असल्याची घटना घडली आहे. त्यावेळी त्या भागातून कोणी जात नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र त्यावेळी होर्डिंगखाली असलेल्या गाड्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. तसेच दोन जण कोरकोळ जखमी झाले आहेत. सकाळी साडे दहाच्या दरम्यान ही घटना घडली.
कल्याणमध्ये वाऱ्यासह पावसाचा जोर होता. त्यावेळी हे होर्डिंग अचानक कोसळले. होर्डिंगखाली त्यावेळी अनेक गाड्या होत्या त्या गाड्यांचे नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी घटनास्थळी भेट दिली असून, संबंधित काँट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना काँट्रॅक्टरच्या मार्फत नुकसान भरपाई देणार आहोत. आणि जखमींवर देखील उपचार करणार असल्याचे सांगितले. शिवाय होर्डिंग संदर्भात ज्या काही तक्रारी आल्या असतील त्या देखील निकाली काढण्याचे आदेश देऊ असे सांगितले.
दरम्यान, कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत वारंवार अशा घटना घडत असतात मात्र महापालिका कधीच या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. जखम झाली का तात्पुरती मलमपट्टी करायची पण कायमस्वरूपी यावर उपाय कधी करणार असा सवाल आता नागरिक करत आहेत. आजच्या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु जर झाली असती तर याला जबाबदार कोण असत? असेही प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यामुळे आता तरी कल्याण डोंबिवली महापालिकेला जाग येईल का?