मोबाईल चोरणारा गजाआड!…
डोंबिवली – मोबाईल चोरून त्याद्वारे पुन्हा नवीन मोबाईल खरेदी करणाऱ्यास टिळक नगर पोलिसांनी अटक केली आहे. शहनवाज उर्फ शाणू फैयाज शेख असे याचे नाव असून, त्याच्याकडून ३०,०००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, चंदनसिंग सिसोदिया हे त्यांच्या दुकानात असताना अज्ञात चोरट्याने त्यांचा ८०००/- रु. चा मोबाईल चोरून नेला असल्याबाबत टिळक नगर पोलीस ठाण्यात गुरनं. ४७६/२४ आयपीसी ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता, मोबाईल चोरटा शहनवाज याने मोबाईल चोरल्यानंतर त्यातील फोन पेद्वारे पैसे देऊन डोंबिवलीतील घरडा सर्कल येथील मोबाईल दुकानामधून २६,०००/- रु.चा मोबाईल खरेदी केला असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुषंगाने पोलिसांनी आणखी तपास करून, शहनवाजला भिवंडीतून अटक केली आणि त्याच्याकडून चोरीचा व खरेदी केलेला असे एकूण २ मोबाईल (किंमत ३०,०००/- रु.) हस्तगत केले.
सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वपोनि विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कोबरणे, पो. हवा. बाबुराव हांडे, पोना संदीप सपकाळे, संदीप भोये, अजित सिंग रजपूत यांनी केली आहे.