सायबर फ्रॉड करण्यासाठी सिमकार्ड पुरवणाऱ्या तिघांना अटक…
Thane – देशभरात शेअर ट्रेड फ्रॉड्स व इतर सायबर गुन्हयात पिडीतांना व्हाट्सअप, इंस्टाग्राम, फेसबूक अशा सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्क करण्याकरीता वापरले जाणारे सिमकार्ड पुरविणाऱ्या तिघांना ठाणे सायबर सेलने अटक केली आहे. अफताब इरशाद ढेबर, मनिषकुमार मोहित देशमुख, भाईजान उर्फ हाफीज लईक अहमद अशी या तिघांची नावे आहेत.
चितळसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे अफताब इरशाद ढेबर, मनिषकुमार मोहित देशमुख याला छत्तीसगड राज्यातून अटक केली. आणि त्यांच्याकडून प्रीऍक्टिव्हेटेड ७७९ मोबाईल सिमकार्ड, १ लॅपटॉप, २ वायफाय राऊटर, २३ मोबाईल हॅन्डसेट्स, ५० क्रेडिट/डेबिट कार्ड्स, २० चेक बुक/पासबुक, रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून भारतातून सिमकार्ड खरेदी करून ती दुबई येथे आर्थिक गुन्हयांचे फसवुणक करण्यास सक्रिय असलेल्या टोळीला विक्री करणारा भाईजान उर्फ हाफीज लईक अहमद याला दिल्लीतून अटक केली.
हे आरोपी रस्त्यावर आणि लहान मोठ्या दुकानात सिमकार्ड विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडे सिमकार्ड खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची दिशाभूल करून बायोमेट्रीक मशिन्सद्वारे एका पेक्षा जास्त बायोमेट्रीक ठसे घेऊन अशी सिमकार्ड गैरकायदेशीर कृत्याकरीता वापरात आणतात. अटक आरोपी आणि त्यांच्या अन्य साथीदारांची गुन्हेगारी साखळी असून ते वरील प्रमाणे मोबाईल सिमकार्ड पुरवठाधारकांशी आणि विक्रेत्यांशी संधांन साधून गैरमार्गाने मोबाईल सिमकार्ड प्राप्त करीत होते. त्यावरून सायबर गुन्हयातील पिडीतांना संपर्क करण्याकरीता सिमकार्डद्वारे व्हॉट्ॲप ऍक्टिव्ह करून, तसेच नमूद मोबाईल नंबर बँक खात्याला संलग्न करून, अपहार केलेली रक्कम वळती करून आंतरराष्ट्रीय स्तरावर सायबर गुन्हे करण्यात सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकारे आरोपींनी रायपुर, विलासपुर आणि दिल्ली येथील सहकारी आरोपींच्या संपर्कातून ऍक्टिव्हेटेड सिमकार्ड कंबोडिया, दुबई, चिन इतर परदेशात सायबर गुन्हयाकरीता पुरविली असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. आणि यापुर्वी एकूण ३००० सिमकार्ड अशा फसवुणकीच्या गुन्हयांमध्ये वापरली असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
तसेच हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल सिमकार्ड, बँक चेकबुक, केडिट/डेबिट कार्डद्वारे संबंधीत बँक खात्यांचे विश्लेषणात्मक तपास केला असता सुमारे ५ ते ६ बँक खात्यांचा गुन्हयांमध्ये सहभाग असल्याचे आणि मोठया स्वरूपाचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले आहे. आणि त्याबाबत राजस्थान, हरयाणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तेलंगणा, गुजरात, केरळ इत्यादी राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये १४ तक्रारी दाखल असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त, ज्ञानेश्वर बव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त, (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा/सायबर पराग मणेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा/सायबर दत्तात्रय पाबळे, सायबर सेल घटकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वारके, पोनि/प्रियंका शेळके, सपोनि मंगलसिंग चव्हाण, सपोनि/प्रदिप सरफरे, सपोनि चेतन पाटील, पोउपनि सुभाष साळवी, पोना/राजेंद्र नेगी, पोना/ प्रविण इंगळे, पोना/गणेश ईलग, पोहवा/चौधरी, पोना/सुहास म्हात्रे, पोकों/सचिन सोनावणे, पोकों/धिरज गायकवाड, पोना/वर्षा माने, पोकों/किशोरी जाधव, पोना/विजय पाटील, पोना/जालिंदर डावरे, पोकों/तेजस भोडिवले यांनी केली आहे.