मुंबई

पार्थ पवारांवर १८०० कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप…

mumbai – शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलगा पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. पार्थ पवारांच्या कंपनीने १८०० कोटींची जमीन फक्त ३०० कोटींत खरेदी केली आणि त्यासाठी स्टँप ड्युटी फक्त ५०० रूपये भरल्याचा दावा दानवेंनी केलाय. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या ४० एकर जमिनीच्या व्यवहारासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ ५०० रुपये भरण्यात आल्याचा आणि हा व्यवहार केवळ २७ दिवसांत पूर्ण झाल्याचा आरोपही दानवे यांनी केला आहे.

या संदर्भात दानवे यांनी एक्स वर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी असे म्हंटले आहे कि,

१८०० कोटींची जमीन
३०० कोटींत खरेदी,
स्टॅम्प ड्युटी अवघे ५०० रुपये!

उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे १ लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे १८०० कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची ३०० कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं.

गंमत तर पुढे आहे..एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, (ते ही महार वतानाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल!

दुसरी बाब, सरकारी यंत्रणाही काय तत्पर झाली पहा.. कमाल झाली! २२ एप्रिल २०२५ रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या ४८ तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे २७ दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या ४० एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये ५००!

फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या.. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र!

दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकरणाच्या संदर्भात मी सर्व माहिती मागवलेली आहे. महसूल विभाग, आयजीआर, लँड रेकॉर्ड संदर्भातील सर्व माहिती मी मागवली आहे. या संदर्भातील योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत. प्राथमिक चौकशीच्या आधारावर मी यासंदर्भात मी पुढे बोलेल. अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही. प्राथमिक स्तरावर जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत. त्यामुळे त्यावर योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोलले पाहिजे. आज माझ्याकडे या संदर्भात माहिती येणार आहे. ती माहिती आल्यानंतर मी शासनाची पुढची दिशा काय? या प्रकरणात काय कारवाई होणार? या सर्व गोष्टी सांगितल्या जातील, असे त्यांनी म्हटले.

तसेच उपमुख्यमंत्री देखील अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील, असे माझे मत नाही. यासंदर्भात आमच्या सरकारचा एकमत आहे. कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे निश्चितपणे ही अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिले जाईल. अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, असे फडणवीसांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page