डोंबिवली: तिसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू…
Dombivali – मित्रासोबत मस्करी करताना एका महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला असल्याची घटना डोंबिवली पूर्वेत घडली आहे. नगीनादेवी मंजिराम असे मृत महिलेचे नाव असून ती या इमारतीमध्ये सफाईचे काम करायची अशी माहिती समोर आली आहे. मानपाडा पोलिसांनी या महिलेच्या मृत्यूप्रकरणी बंटी टाक नावाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून, याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्व कल्याण शीळ रोडवर विकास नाका परिसरात ग्लोब स्टेट नावाची इमारत आहे. या इमारतीमधील एका कार्यालयात नगीनादेवी मंजिराम ही महिला साफसफाईचे काम करत होती.
नगीनादेवी तिचा मित्र बंटी सोबत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जिन्याजवळ बसली होती. ती बसली असताना बंटी तिच्यासोबत मस्करी करीत होता. याच दरम्यान बंटीचा हात तिला लागला आणि तोल गेल्याने क्षणार्धात नगीनादेवी तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडली. त्याचवेळी बंटीचा देखील तोल गेला, मात्र तो वाचला.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बंटीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.