मराठवाडा, विदर्भात भूकंपाचे धक्के…
महाराष्ट्र – मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील एका जिल्ह्यात आज भूकंपाचे धक्के बसले असल्याची माहिती समोर आली आहे. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या तीन तर विदर्भातील वाशीम या एका जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी हा धक्का जाणवला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यासह विदर्भात झालेल्या या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात होता. तर येथून निघालेल्या भूकंपाचे धक्के नांदेड व परभणी जिल्ह्यात जाणवले.
परभणी जिल्ह्यातील परभणी शहर, सेलु आणि गंगाखेड भागात भूकंपाचे धक्के बसले. तसेच विदर्भातील वाशिमसह हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले. वाशिममधील रिसोड तालुक्यातील काही भाग, पैठण तालुक्यातील पाचोड परिसर हादरले. त्याचबरोबर हिंगोलीतील पिंपळदरी, राजदरी, वसमत भागाला भूकंपाचे धक्के जाणवले.