राज्याच्या शासकीय आश्रमशाळेत मोठा दूध घोटाळा, रोहित पवारांचा आरोप…
पुणे – शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील आदिवासी आश्रम शाळेत दूध विक्रीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पुराव्यांसह आकडेवारी सादर करुन जादा दराने दूध विकल्याचा आरोप केला.
रोहित म्हणाले, मला निनावी व्यक्तीने 11 फाईल्स पाठवल्या आहेत. त्यापैकी दोन फाईल्स मी आणल्या आहेत. ज्यामधे महत्त्वाच्या खात्यातील भ्रष्टाचाराची माहिती आहे. पहिला घोटाळा आश्रम शाळेतील आहे. राज्यातील 1 लाख 87 हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी 250 मीली दूध देणे आवश्यक होते. त्यासाठी दोन कंपन्यांशी पहिला करार 2018-2019 साली आणि दुसरा करार 2023 – 2024 दरम्यान झालेला आहे. या करारानुसार 146 रुपये प्रतिलिटर दराने कंत्राटदारास पैसे देण्यात आले.
शेतकऱ्यांकडून तीस रुपये प्रति रुपये तर टेट्रा पॅक 55 रुपये प्रतिलिटरने दूध खरेदी करायला हवे होते. यासाठी 85 कोटी रुपये खर्च यायला हवा होता. मात्र प्रत्यक्षात 165 कोटी रुपये देण्यात आले आणि 80 कोटींची दलाली देण्यात आली. यासाठी आंबेगाव तालुक्यातील एका खासगी दूध उत्पादक संस्था आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील सहकारी दूध उत्पादक संस्थेला कंत्राट देण्यात आले.
आदिवासी मुलांच्या आश्रमशाळेत दूध खरेदीसाठी ८० कोटी रुपयांची दलाली गेल्या दहा महिन्यांत देण्यात आली. दोन कंपन्यांना ही दलाली देण्यात आली. या कंपन्या कोणाच्या आहेत, कशाच्या आहेत त्याचा अभ्यास झाला पाहिजे. आम्ही विकासासाठी सत्तेत गेलो, असे काही लोक सांगत आहेत. मात्र शेतकऱ्यांकडून दूध 30 रुपयांना घेऊन ते 143 रुपयांना विकले जात आहे. मग हा शेतकऱ्यांचा विकास आहे की तुमच्या (सत्ताधाऱ्यांच्या) मित्रांचा आहे, हे त्यांनी सांगितले पाहिजे, अशी टीका रोहित पवार यांनी केली.