कल्याणमधील मंदिरात चोरी…
कल्याण – कल्याण पूर्वेकडील कचोरे येथील गावदेवी मंदिरात पुन्हा एकदा चोरी झाली आहे. २ चोरट्यांनी देवीच्या चांदीच्या पादुका चोरून नेल्या. हा सर्व प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चांदीच्या पादुकांची किंमत अंदाजे ३० हजार रुपये इतकी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास दर्शन घेण्याच्या बहाण्याने आधी एक चोरटा देवळात शिरला, त्याने देवीची पूजा करत तिला नमस्कार केला. त्यानंतर काही मिनिटांनी बाहेर उभा असणारा दुसरा चोरटा आतमध्ये आला. त्यानेही देवीची पूजा करत तिला नमस्कार केला. आणि मग देवीच्या मूर्तीसमोर ठेवलेल्या चांदीच्या पादुका उचलल्या आणि तेथून पळून गेले.
त्यानंतर देवीसमोर चांदीच्या पादुका नसल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.