बेकायदेशीर गावठी दारू बनविणा-या हातभट्टीवर कल्याण गुन्हे शाखेची कारवाई; ७ लाखांचा मुद्देमाल केला नष्ट…
कल्याण – कल्याण गुन्हे शाखेने बेकायदेशीर गावठी दारू बनविणा-या हातभट्टीवर कारवाई करत ७ लाखांचा मुद्देमाल नष्ट केला.
हिललाईन पोलीस ठाण्याचे हदद्दीतील कुंभार्ली गावापासून सुमारे एक ते दिड किलो मिटर अंतरावर असलेल्या शेतातील झाडाझुडपात, मोकळया जागेत बेकायदेशीररित्या गावठी दारू तयार करण्यासाठीची हातभट्टी चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे हि हातभट्टी चालू असताना पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून १०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये सुमारे ८० लिटर गावठी हातभटट्टीची दारू, २०० लिटर क्षमतेच्या ६० प्लास्टिक ड्रममध्ये एकुन १२००० लिटर गावठी दारू बनविण्यासाठी लागणारा वॉश व दारू गाळण्यासाठी लागणारी साधने असा एकूण ७,४०,१००/- रू. किमंतीचा प्रोव्हीबीशन गुन्हयाचा माल मिळून आल्याने तो जागीच नष्ट केला. तसेच सदर प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
सदर यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, सहा. पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक ३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सहा. पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण, पो. हवा. विश्वास माने, दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, अनुप कामत, विलास कडु, चा.पो.हवा. अमोल बोरकर यांनी केली.