चोरी करणाऱ्या महिलेस मानपाडा पोलिसांनी केली अटक…

डोंबिवली – फेसबुकच्या माध्यमातून ओळख करून नागरीकांचा विश्वास संपादन करुन चोरी करणाऱ्या महिलेस मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. समृध्दी खडपकर असे या महिलेचे नाव असून पोलिसांनी सदर महिलेचा साथीदार विलेंडर विल्फड डिकोस्टा याला देखील अटक केली आहे.

हि महिला फेसबुकच्या माध्यमातून अनेक लोकांशी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन करुन, त्यांना वेगवेगळया हॉटेलमध्ये बोलावून त्यांच्या दारुमध्ये गुंगीकारक पदार्थ टाकायची त्यानंतर गुंगी आल्यावर त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन अशा वस्तू चोरी करून पळून जायची. आणि चोरलेल्या वस्तू ती तिचा साथीदार विलेंडर विल्फड डिकोस्टा यांच्याकडे द्यायची त्यानंतर विलेंडर त्या वस्तू बाजारात स्वस्तात विकत असायचा.
याबाबत वृत्त असे आहे कि, फिर्यादी महेश पाटील यांनी त्यांची फेसबुकच्या माध्यमातून समृध्दी खडपकर या महिलेशी ओळख झाली. सदर महिलेने त्यांना फेसबुकच्या माध्यमातून खोणीगांव येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यास बोलाविले. सदर हॉटेलमध्ये गप्पा करताना तिने त्यास बोलण्यात गुंतवून ती त्याच्यावर प्रेम करते असे दाखवून त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांना सदर हॉटेलमध्ये असलेल्या लॉजचे खोलीत घेऊन गेली. तेथे त्या दोघांनी जेवण केले. त्यानंतर फिर्यादी हे बाथरुममध्ये गेल असता, सदर महिलेने फिर्यादी यांचे रिव्हॉल्व्हर, मोबाईल, सोन्याच्या ३ चैन, सोन्याचे कडे, १ घडयाळ असा ४,७५,०००/- रु चा ऐवज घेऊन ती तेथून पळून गेली असल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरुन मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता, तिच्याविरुद्ध अशाच प्रकारे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी आणखी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर महिलेस गोवा राज्यातील पेड म्हापसा, जि. बारदेज येथून अटक केली. तसेच तिचा साथीदार विलेंडर विल्फड डिकोस्टा याला देखील अटक केली. पोलिसांनी या दोघांकडून चोरी केलेले १६ मोबाईल, १ रिव्हॉलव्हर, ६ जिवंत काडतूस, २ घड्याळ, २९० ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण २०,८१,०००/- रु. मुद्देमाल जप्त केला.
सदरची यशस्वी कामगिरी दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ३, कल्याण, सुनिल कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनिरी शेखर बागडे, सपोनिरी. अविनाश वनवे, सपोनिरी. सुनिल तारमळे, पोहवा सुशांत तांबे, पोहवा सुनिल पवार, पोहवा राजेंद्रकुमार खिलारे, पोहवा दिपक गडगे, पोहवा विकास माळी, पोना शांताराम कसबे, पोना यलप्पा पाटील, पोना देवा पवार, पोना प्रविण किनरे, पोशि बालाजी गरुड, मपोहवा अरुणा चव्हाण, मपोना प्राजक्ता खरनार यांनी केली.