अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा न करण्याचे ठाणे महापालिकेचे निर्देश…
ठाणे – सध्या सुरू असलेल्या किंवा नजीकच्या काळात पूर्णत्वास येऊन अव्याप्त असलेल्या अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा करू नये असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी टोरंट वीज कंपनीला दिले आहेत. तसेच, अनधिकृत बांधकामांना पाणी पुरवठा कनेक्शन दिल्यास किंवा विना परवानगी पाणी पुरवठा होत असल्याचे दिसल्यास पालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांवर कार्यालयीन शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही आयुक्त बांगर यांनी नगर अभियंता यांना दिले आहेत.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयुक्त बांगर यांनी महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचा सर्व परिमंडळ उपायुक्त आणि सहायक आयुक्त यांच्या बैठकीत आढावा घेतला होता. त्यावेळी ठाणे महापालिका हद्दीतील वेगवेगळ्या स्थितीतील अनधिकृत बांधकामे हे प्रशासकीय यंत्रणा म्हणून आपल्यासाठी भूषणावह नाही. या अनधिकृत बांधकामांकडे यंत्रणेने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचे ठरवले आहे का, अशा शब्दांत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
तसेच, प्रत्येक अनधिकृत बांधकामावर ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे. अनधिकृत बांधकामांना पाणी, वीज यांची नवीन जोडणी मिळणार नाही याची खबरदारी घेतली जावी. अशा बांधकामांना नवीन पाणी जोडणी मिळाली तर महापालिकेच्या कार्यकारी अभियंता यांना निलंबित केले जाईल, असे स्पष्ट निर्देश आयुक्त श्री. बांगर यांनी दिले होते. महापालिकेच्या नगर नियोजन विभागाचा ना हरकत परवाना असल्याशिवाय कोणत्याही परिस्थिती पाणी व वीज पुरवठा होणार नाही, हे सुनिश्चित करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
त्या पार्श्वभूमीवर, कळवा, मुंब्रा, दिवा विभागात वीज पुरवठा करणाऱ्या टोरंट वीज कंपनीला तसेच, महापालिकेचे नगर अभियंता यांना सर्तक राहून कारवाई करण्याबाबत लेखी निर्देश दिले आहेत.
अनधिकृत बांधकामांना वीज जोडणी नको
कळवा, मुंब्रा, दिवा विभागात अनधिकृत बांधकामांना वीज जोडणी सर्रास दिली जात असल्याचे निदर्शनास येते. अनधिकृत बांधकामांना सोयी सुविधा पुरवू नयेत असे राज्य शासनाचे निर्देश आहेत. तसेच, बऱ्याच न्यायालयीन प्रकरणात अशा अनधिकृत बांधकाम वीज जोडणी न देण्याबाबत मा. उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. तरीही महापालिका क्षेत्रात अनधिकृतपणे विकसित होणाऱ्या बांधकामांना वीज जोडणी देण्यात येते. यामुळे अनधिकृत बांधकामांना अप्रत्यक्षरीत्या प्रोत्साहन दिले जाते. ही बाब गंभीर असल्याचे आयुक्त बांगर यांनी टोरंट वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना लेखी कळवले आहे.
सध्या सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांना वीज जोडणी मंजूर करू नये अथवा प्रत्यक्ष वीज जोडणी करून देऊ नये. या संदर्भात आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना सूचना देण्यात याव्यात, असेही आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले आहे.
अनधिकृत बांधकामांना वीज जोडणी दिल्यास आणि सदरचे अनधिकृत बांधकाम किंवा इमारत कोसळून दुर्घटना घडल्यास, त्यात जीवित अथवा वित्त हानी झाल्यास त्यास टोरंट वीज कंपनीकडील सर्व अधिकारी जबाबदार असतील, याची नोंद घ्यावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
कार्यकारी अभियंत्यांवर शिस्तभंगाची कारवाई
महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांना सर्रासपणे पाणी पुरवठ्याचे संयोजन देण्यात येत आहे. अथवा असे बांधकामधारक महापालिकेची पूर्व परवानगी न घेता परस्पर नळ संयोजन घेत आहेत. त्यातून अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन मिळते. त्यामुळे, सध्या सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांना पाणी पुरवठा, नळ कनेक्शन मंजूर करू नये अथवा प्रत्यक्ष नळ कनेक्शन देऊ नये. असा पाणी पुरवठा होत असल्याचे किंवा नळ कनेक्शन दिल्याचे निर्दशनास आल्यास संबंधित कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग यांच्याविरुद्ध कार्यालयीन शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर, विभाग स्तरावर भरारी पथक तयार करण्यात यावे. या भरारी पथकाने विभागात नियमितपणे पाहणी करून पाणी पुरवठा किंवा नळ कनेक्शन मिळालेल्या अनधिकृत बांधकामांचा शोध घ्यावा. असे नळ कनेक्शन तत्काळ खंडित करावेत व संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करावा. ही मोहिम तत्काळ हाती घेऊन त्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल देण्यात यावा, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले आहे.