सुप्रीम कोर्टाचे विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर ताशेरे…
नवी दिल्ली – शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह या मुद्द्यावरुन पहिली सुनावणी पार पडली. त्यानंतर आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी पार पडली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. तसेच विधानसभा अध्यक्षांना एका आठवड्यात सुनावणी घ्या, असा आदेश दिला आहे.
सुप्रीम कोर्टाने ११ मे ला राज्याच्या सत्तासंघर्षावर निकाल दिला होता. त्यावेळी कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता. विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा, असे कोर्टाने म्हटले होते. पण अजूनही १६ आमदारांच्या अपात्रेसंदर्भातला निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न घेतल्याने ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली.
सुनावणी करताना सरन्यायाधीश म्हणाले की, ११ मे ला निकाल देण्यात आला आहे. तरी, केवळ नोटीस बजावण्यात आली आहे. आमदार अपात्रतेसंदर्भात आम्ही निर्देश देताना तीन महिन्यांची मर्यादा ठेवली नव्हती. पण सुप्रीम कोर्टाचा आदर केला पाहिजे. या प्रकरणातील सुनावणीमध्ये वेळकाढूपणा का करत आहेत, असे न्यायालयाने राहुल नार्वेकरांना सुनावले आहे.
आमदार अपात्रतेसंबंधी निर्देश देताना पुढील सुनावणीपूर्वी नेमकी काय कारवाई केली याची माहिती अध्यक्षांनी द्यावी. अशा पद्धतीने अनिश्चित काळ काम करू शकत नाही, किती वेळेत काम करणार याचे टाईम टेबल विधानसभा अध्यक्षांनी द्यावे, असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
दरम्यान, शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह या प्रकरणाच्या याचिकेवर ३ आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. तर अपात्रतेच्या प्रकरणावर २ आठवड्याने सुनावणी होणार आहे.