कळवा खाडी किनारी वसलेल्या अनधिकृत झोपड्यांवर कारवाई…
ठाणे – कळवा खाडीकिनारी भागाला अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या झोपड्यांचा विळखा असल्याने खाडीकिनारी भागांचा विकास करण्यामध्ये अनेक अडथळे येत आहे. तसेच दिवसेंदिवस खाडीकिनारा बुजविला जात असल्यामुळे भविष्यात या ठिकाणी मोठी हानी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर कळवा खाडीकिनारी वसलेल्या अनधिकृत झोपड्यावर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली.
कळवा येथील क्रांतीनगर या खाडीकिनारी वसलेल्या तसेच खाडीमध्ये अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या झोपडपट्टीवर कारवाई करण्यात आली. सदर ठिकाणच्या झोपड्यांपैकी आज 65 ते 70 झोपड्यांवर कारवाई करुन त्या तोडण्यात आल्या. खाडीमध्ये नव्याने उभारण्यात येत असलेल्या झोपड्याही या कारवाईत निष्कसित करण्यात आल्या. जेसीबी पोकलेनच्या सहाय्याने सदरची कारवाई करण्यात आली.
महापालिकेचे परिमंडळ 2 चे उपायुक्त शंकर पाटोळे,पोलीस परिमंडळ उपायुक्त गणेश गावडे, नौपाडा कोपरी प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, अतिक्रमण, पाणीपुरवठा तसेच विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांसमवेत पोलीस बंदोबस्तात सदरची कारवाई करण्यात आली. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण यावर सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याचेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले.