घरफोडी करणारा सराईत गजाआड…

ठाणे – घरफोडी करणा-या सराईत इसमास काशिमीरा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. अब्दुल शेख ऊर्फ अब्दुल चिरा असे याचे नाव आहे.
फिर्यादी अकबर अली मोहम्मद अली चुडीहार यांच्या घरातील एकूण २९३ ग्रॅम वजनाचे १४,६५,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, १ किलो वजनाचे ७०,०००/- रुपये किंमतीचे चांदीचे दागिने व ९,००,०००/- रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल अज्ञात इसमाने घरफोडी चोरी करुन नेल्याबाबत काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे नालासोपारा रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून अब्दुल शेख ऊर्फ अब्दुल चिरा यास अटक केली. त्याच्याकडून ७,७५,७००/- रोख रुपये, २९३ ग्रॅम वजनाचे १४,६५,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व ८५० ग्रॅम वजनाचे ७०,०००/- रुपये किंमतीचे चांदीचे दागिने असा एकूण २३,१०,०००/- रुपये किंमतीचा मुदेमाल हस्तगत केला.
दरम्यान, अब्दुल शेख ऊर्फ अब्दुल चिरा हा सराईत असून त्याच्याविरुध्द मुंबई, ठाणे, पालघर, अजमेर राज्य – राजस्थान या परिसरात घरफोडीचे ४० हुन अधिक गुन्हे दाखल आहेत.