तरुणाचा खून करणारे तिघे अटकेत…
नालासोपारा – एका २१ वर्षीय तरुणाची गावठी पिस्तुलने फायरिंग करून हत्या करणाऱ्या तिघांना हत्यारासह गुन्हे शाखा, कक्ष २ वसई पोलिसांनी अटक केली. १) नदीम इक्बाल अब्दुल अहमद शेख २) मोहम्मद सुफीयान झाकीर हुसेन शेख ३) जिसान उर्फ सोनु जावेद खान अशी या तिघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून १ अग्नीशस्त्र व ३६ जिवंत काडतुसे, मोबाईल फोन असा माल जप्त केला.
याबाबत वृत्त असे आहे कि, मांडवी पोलीस ठाण्याचे हद्दीत तिल्हेर, घुमाळपाडा येथील पारोळ भिवंडी रोड पासून अंदाजे २० फुट अंतरावर ठक्करभाई यांचे विटभटटी जवळ, कच्चा रोडवर कमरुद्दीन गयासुददीन चौधरी या तरुणास कोणीतरी अज्ञात इसमांनी कोणत्यातरी अज्ञात हत्याराने मारहाण करून जिवे ठार मारले असल्याची फिर्याद रामदार रघुनाथ बुरुड यांनी दिल्यावरुन मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता, कमरुद्दीन हा त्याच्या परीसरातील मोहम्मद सुफीयान झाकीर हुसेन शेख याच्यासोबत घटनेच्या अगोदर भिवंडी येथे गेल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहम्मद सुफीयान यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पैशाच्या हव्यासापोटी त्याचे मित्र १) नदीम इक्बाल अब्दुल अहमद शेख २) जिसान उर्फ सोनु जावेद खान यांच्या मदतीने कमरुद्दीन यास भिवंडी येथे भंगाराचा माल दाखविण्याचा बहाणा करुन सुफीयानने त्याचे मोटार सायकलवर कमरुद्दीन यास मध्ये बसवून घेऊन जाऊन भिवंडी रोडवर येत असताना चालत्या मोटार सायकलवर पाठीमागे बसलेल्या नदीम याने त्याचे जवळील गावठी पिस्तुलाने कमरुद्दीन याच्या डोक्यास पाठीमागून दोन राऊन्ड फायर करुन त्याचा खून केला असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी १) नदीम इक्बाल अब्दुल अहमद शेख २) जिसान उर्फ सोनु जावेद खान यांना देखील अटक केली.