महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी – उद्धव ठाकरे…

रत्नागिरी – ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे कोकणात बारसू दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी दोन गावांना भेट देत रिफायनरी प्रकल्पाला विरोध असणाऱ्या ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, दोन गावात मी गेलो आहे. माझी भूमिका मी स्पष्ट केलीच आहे. नाणार प्रकल्प येथे होऊ नये या तिथल्या ग्रामस्थांच्या मागणीला पूर्ण पाठींबा देऊन शिवसेना त्या आंदोलनात उतरली होती आणि तो प्रकल्प तिथून घालवला. त्याचवेळेला माझी भूमिका स्पष्ट होती की, प्रकल्पाला विरोध किंवा समर्थन आम्ही बसल्या जागेवर आमच्या मनाने करत नाही. ज्या कोणाला हा प्रकल्प हवा असेल आणि तिथे त्याचं स्वागत होत असेल तर तो प्रकल्प तिथे नक्की व्हावा.
मी मुख्यमंत्री झाल्यावर आता जे सुपारी घेऊन फिरत आहेत ते गद्दार त्यांनी मला अस सांगितल की, हा प्रकल्प जिथे प्रस्तावित आहे त्याला लोकांचा विरोध नाही. बरीच जमीन निर्मनुष्य आहे. पर्यावरणाची हानी सुद्धा होणार नाही किंवा कमीत कमी होईल. जो तुमचा आक्षेप नाणारच्या वेळेला होता की, पर्यावरणाची हानी होणार नाही, जनतेचा विरोध राहणार नाही अशा पद्धतीने जर प्रकल्प आणला तर आम्ही तो करू. तुमच्या सर्वांच्या लक्षात असेल की, मग ते पत्र केंद्राला पाठवलं. या ठिकाणी रिफायनरी होऊ शकते की नाही याची चाचपणी करुन जर त्यांनी होय म्हटलं असतं तर त्यानंतर माझी अशी मांडणी होती की, जसा आज मी आलो आहे तसच मुख्यमंत्री म्हणून सुद्धा मी आलो असतो आणि जनतेला समोरासमोर प्रेझेंटेशन देऊन होय की नाही मी केल असत. दुर्दैवाने केवळ पत्राचं भांडवल केल जात आहे. पण जो पारदर्शकपणा हवा तो नाहीये.
जर हा प्रकल्प चांगला आहे तर महाराष्ट्रातील सर्व पोलीस आज बारसू येथे का आणले आहेत. घराघरात पोलीस का घुसवले आहेत. लाठ्या-काठ्या आणि अश्रूधूरचा वापर येथे का केला जात आहे. याच उत्तर मिळत नाहीये. जसा मी आज बारसूमध्ये आलो तस त्या सुपारी बहाद्दारांनी याव आणि द्याव प्रेझेंटेशन. मी कुठे अडवणार आहे. पण लोक विरोध करत असतील तर मी सुद्धा शिवसेना म्हणून त्याचा विरोध करणार असही उद्धव ठाकरे म्हणाले.
जर मी दबावाखाली असतो तर इथे पुन्हा का आलो असतो. माझ्याच काळात वेदांता-फॉक्सकॉन येणार होता तो का घालवला, गुजरातला का घालवला. एअरबस का दिलात. इतरही प्रकल्प का दिले. म्हणजेच चांगले प्रकल्प होते ते सर्व गुजरातला. म्हणजे महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी. माझ आवाहन आहे की, हा प्रकल्प गुजरातला न्या आणि वेदांता-फॉक्सकॉन किंवा इतर प्रकल्प ज्यावर वाद नव्हता ते प्रकल्प महाराष्ट्राला पुन्हा द्या असही उद्धव ठाकरे म्हणाले.