ठाणे

रस्ते सफाईच्या कामात सुधारणा करण्याची अखेरची संधी…

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा सफाई ठेकेदारांना इशारा...

ठाणे – ठाणे शहरातील रस्ते सफाईच्या कामांबद्दल कोणीही समाधानी नाही. या रस्ते सफाईच्या कामात सुधारणा करण्याची  अखेरची संधी आहे. यात सुधारणा झाली नाही, तर नवीन निविदा प्रक्रियेतून बाहेर जावे लागेल. तसेच, रस्ते स्वच्छ झाले नाहीत, तर खड्डे पडल्यावर जसा दंड आकारणे प्रस्तावित आहे, तसाच दंड केला जाईल, असा इशारा ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सफाई ठेकेदारांना दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्ते सफाईच्या गुणवत्तेबद्दल काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यानुसार, स्वच्छतेबद्दलची परिस्थिती सुधारण्यासाठी महापालिका वेगवेगळी पावले उचलत आहे. त्या प्रयत्नांचा भाग म्हणून आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहरातील २६ गटांमध्ये काम करण्याऱ्या नऊ एजन्सी आणि त्यांचे ठेकेदार यांची बैठक घेतली. या बैठकीस, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तुषार पवार, आरोग्य अधिकारी बालाजी हळदेकर उपस्थित होते.

सध्या कार्यरत असलेले ठेकेदार मुदतवाढीवर काम करत आहेत. नवीन निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून ती पारदर्शक पद्धतीने केली जाईल. त्यातील अटी आणि निकष असे केले आहेत की ठेकेदाराचे कमी दर्जाचे काम चालून जाणार नाही. या निविदा प्रक्रियेत टिकायचे असल्यास आताच कामात सुधारणा करण्याची गरज असल्याचे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.

रस्ते सफाईचे काम करताना काही अडचण आल्यास, तक्रार असल्यास थेट मला सांगा. पण काम चांगले झाले नाही, तर कारवाईसाठीही तयार रहा, असा इशारा आयुक्त बांगर यांनी दिला. स्वच्छतेच्या कामात आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे. यामध्ये थोडीही कुचराई चालणार नाही. जो रस्ता किंवा विभाग ज्याच्याकडे आहे त्याने त्या रस्त्याची पूर्ण जबाबदारी घेणे अपेक्षित आहे, असेही आयुक्तांनी नमूद केले.

सकाळी सहा वाजता रस्ते सफाईचे काम सुरू व्हायला पाहिजे. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडतील तेव्हा त्यांना शहर स्वच्छ दिसेल. रात्री शहरातील दुकाने, व्यापारी गाळे असलेले भाग स्वच्छ केले, म्हणजे सकाळी तो कचरा दिसणार नाही. जेवढे लवकर काम सुरू होईल तेवढे चांगले आहे. आठ ते साडेआठपर्यंत रस्ते झाडण्याचे काम पूर्ण होईल. त्याप्रमाणेच दुपारी १२ ते २ या काळात ड्युटी संपण्यापूर्वी आपापल्या रस्त्यावर फेरफटका मारून कुठे काही कचरा असेल तर तो साफ करावा, असे आदेश आयुक्तांनी दिले.

महापालिकेने कामकाजात व्यावसायिक (professional) दृष्टीकोन ठेवला पाहिजे. त्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याची जाणीव ठेवूनच काम केले पाहिजे, असेही आयुक्त बांगर म्हणाले.

ठेकेदारांचे पैसे देण्यात महापालिकेनेही काही वेळा उशीर केला आहे. यापुढे असे होऊ नये, यासाठी बँकेमध्ये स्वच्छता विषयक सर्व कामांची देयके अदा करण्यासाठी स्वतंत्र बॅंक खाते (एस्क्रो खाते) उघडण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात ठेकेदारांची देयके देण्यात विलंब होणार नाही. एक महिन्याच्या देयकाएवढी जास्तीची रक्कम बॅंकेच्या या खात्यात नियमितपणे जमा केली जाईल, अशी ग्वाही बांगर यांनी दिली.

कर्मचाऱ्यांना, गणवेश नसणे, सुरक्षा जॅकेट नसणे, हलक्या दर्जाचे हातमोजे, पगार वेळेवर न होणे अशा काही अडचणींना तोंड द्यावे लागते. एका बाजूला सफाई कर्मचारी यांच्या कामात त्रुटी राहू नये या बाबत आपण दक्ष आहोत. त्याचवेळी त्यांचे गणवेश, दिल्या जाणाऱ्या सुविधा यामध्येही कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हेही  पाहिले पाहिजे. हातमोजे देताना कर्मचाऱ्यांना झाडू पकडताना काही अडचण येते का, हे पाहून कंत्राटदारांनी हातमोजे घ्यावे. सुरक्षेसाठी असलेले रिफ्लेक्टरवाले जॅकेट आणि त्यावर ठाणे महापालिकेचा लोगो किंवा नाव सुस्पष्ट असावे. सफाई कर्मचारी गणवेश आणि सुरक्षा जॅकेट शिवाय दिसणार नाही, याची जबाबदारी कंत्राटदाराची राहील. गणवेश परिधान केल्यावर त्या संस्थेचे प्रतिनिधी म्हणून पाहिले जाते, त्यामुळे गणवेशातील कर्मचाऱ्याची त्या संस्थेसाठी जबाबदारीने वागण्याची जाणीव वाढते, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.

रस्ते सफाई आणि परिसर स्वच्छता यांची पाहणी करण्यासाठी कंत्राटदारांनी गटनिहाय निरीक्षक नेमावेत. तसेच, स्वतः रस्त्यावर उतरून कामाची गुणवत्ता तपासावी, त्यामुळे कामाच्या दर्जा निश्चित सुधारणा होईल, अशी सूचनाही बांगर यांनी केली.

धुळमुक्त शहर…

ठाणे शहरात धुळीची मोठी समस्या आहे. रस्त्याच्या साईड पट्टीमध्ये सगळीकडे माती दिसते. अस्वच्छ रस्त्याचा परिणाम रस्त्यांच्या टिकावूपणावरही होतो, त्याचबरोबर प्रदूषणात भर पडते. हे लक्षात घेऊन एखादी टीम ही धूळ हटवण्याच्या कामी लावावी, अशी सूचना आयुक्त बांगर यांनी केली. पावसाच्या पाण्याचा सहजगत्या निचरा व्हावा म्हणून गटारांना छोटे आऊटलेट ठेवलेले असतात. बरेचदा त्यातून कचरा गटारात लोटल्याचे तसेच, बाटल्या, प्लास्टिक, अवजड साहित्य हे रस्त्याच्या दूभाजकांमध्ये टाकून दिल्याचे दिसते. या दोन्ही गोष्टी तातडीने थांबायला हव्यात, असे आदेश बांगर यांनी दिले. कचरा करणे, थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे यासाठी महापालिकेने दंडाच्या रकमा वाढवलेल्या आहेत. त्यानुसार कारवाई केली जाईल. मात्र, मुळात रस्ते आणि परिसर स्वच्छ आहे असा दृश्य परिणाम नागरिकांना दिसू लागला तर त्यांच्या बेशिस्त वर्तनालाही आळा बसेल. शिवाय सफाई कर्मचाऱ्यांविषयी आत्मीयता वाढून ठाणेकर स्वतः रस्ते सफाईसाठी मदत करतील, अशी अपेक्षा आयुक्त बांगर यांनी व्यक्त केली.         

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page