ठाणे – अवैध रेती उपसा प्रकरणी कारवाई…

ठाणे – जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खननाविरुद्ध जिल्हा प्रशासनाची कारवाई सुरूच असून मुंब्रा खाडी व काल्हेर ते कोन खाडी दरम्यान केलेल्या कारवाईत ५ बार्ज व २ सक्शन पंप असा एकूण सुमारे ९७ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खननाविरुद्ध जिल्हा प्रशासनातील रेती शाखा, तहसीलदार, तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या पथकाने धडक कारवाई सुरू केली आहे. भिवंडी उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशावरून मौजे काल्हेर ते कोन खाडीमध्ये तालुक्यातील तलाठी, मंडळ अधिकारी आदींचे पथक गस्तीवर गेले होते. यावेळी या खाडीमध्ये अनधिकृतरित्या रेती उपसा करणारे २ बार्ज व १ सक्शन पंप आढळून आले. पथकाची चाहूल लागताच बार्जवरील व्यक्ति पळून गेले. सापडलेल्या बार्जचे वॉल खोललेले असल्याने खाडी बाहेर काढणे शक्य नसल्याने पथकाने कारवाई करून दोन्ही बार्ज व १ सक्शन पंप खाडीच्या पाण्यात बुडविले. या मुद्देमालाची किंमत अंदाजे २७ लाख इतकी होती.
ठाणे तहसील कार्यालयाच्या तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या पथकाने ठाणे खाडीतील मुंब्रा रेतीबंदर परिसरात गस्त घातली. यावेळी त्यांना ३ बार्ज व १ सक्शन पंप अवैधरित्या रेती उपसा करत असल्याचे आढळून आले. यावर पथकाने कारवाई करून सुमारे ७० लाख किंमतीचे तीनही बार्ज व सक्शन पंप नष्ट केले.