सकल हिंदू समाजाच्या मोर्चावेळी तणाव…

Nashik – नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चावेळी प्रचंड तणाव निर्माण झाला असल्याची माहिती समोर आली आहे. दुकानं बंद करण्याच्या कारणावरून आधी वाद सुरू झाला, वादाचं रुपांतर हाणामारीत आणि नंतर दगडफेकीमध्ये झाले, त्यामुळे नाशिकमधली परिस्थिती तणावपूर्ण बनली.

मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आज, १६ ऑगस्ट सकल हिंदू समाजाकडून नाशिक शहर बंदची हाक देण्यात आली होती. दुपारच्या सुमारास सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी भद्रकाली परिसरात काही दुकानं उघडी होती. आंदोलकांनी दुकानदारांना दुकान बंद करण्याचे आवाहन केले, पण दुकानदारांनी त्यांना नकार दिल्यामुळे दोन्ही गटात वाद झाला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती. मात्र संध्याकाळी पुन्हा परिस्थिती बिघडली आणि तुफान दगडफेक झाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला.
दरम्यान, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर शहरात पुन्हा तणाव निर्माण होऊ नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.