dombivali : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार…

dombivali – डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका हॉटेल चालकाला अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. अंगूर सिंह असे हॉटेल चालकाचे नाव आहे. काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिघांनी सामूहिक अत्याचार केला असल्याची माहिती समोर आली आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी ही उत्तर प्रदेशातील मूळ रहिवासी आहे. ती काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीतील आपल्या नातेवाईकांच्या घरी राहण्यासाठी आली होती. घरगुती वाद झाल्याने ती घरातून निघून गेली. दरम्यान, बदलापूर-कटाई रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जेवण घेण्यासाठी ती गेली असता, तिच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे हॉटेल चालकाने तिला खायला दिले.

त्यानंतर अंगूर सिंह याने मदत करण्याच्या बहाण्याने तिचा विश्वास संपादन केला. आणि दोन अल्पवयीन तरुणांशी तिची ओळख करून दिली. पीडित मुलीने या तिघांनाही आपण घरातून निघून आलो असल्याचे सांगितले. त्यावर या तिघांनी तिला कामावर लावून देतो आणि राहायला घरही देतो असे आमिष दाखवून एका निर्जन ठिकाणी नेले. आणि तेथे या तिघांनीही या मुलीवर सामूहिक अत्याचार केला.
आणि तिला रस्त्यावरच सोडून दिले. त्यानंतर पीडित मुलगी कुळगाव-बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचली. तेथे काही सुजाण नागरिकांनी तिला पाहिले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. मुलीने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. मुलगी घरातून निघून गेल्यामुळे मानपाडा पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल होता. त्यामुळे बदलापूर पोलिसांनी तात्काळ याची माहिती मानपाडा पोलिसांना दिली. माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तपास करून सदर तिघांना ताब्यात घेतले.
दरम्यान, आरोपी अंगूर सिंह याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, इतर दोन अल्पवयीन मुलांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत.


