मुंब्रा : AIMIM नगरसेविका सहर शेख विरोधात पोलिसांकडे तक्रार…

thane – मुंब्रा येथील AIMIM च्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी दोघांनी आज मुंब्रा पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. यावेळी किरीट सोमय्या यांनी सहर शेख यांच्या भाषणाचा व्हिडिओ पोलिसांना दाखवत तातडीची आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

पोलिस प्रशासनाने यापूर्वीच सहर शेख यांना नोटीस बजावून समज दिली असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, ही कारवाई अपुरी असून ती मान्य नसल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

किरीट सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी बजावलेल्या नोटीसमध्ये सहर शेख यांनी भविष्यात वृक्षलागवड करून मुंब्रा हिरवे करण्याचे विधान केल्याचा उल्लेख आहे. पण प्रत्यक्ष भाषणात कुठेही वृक्ष किंवा झाडे लावण्याचा उल्लेख नसल्याचा दावा त्यांनी केला. उलट, भाषणादरम्यान मुंब्रा येथील २० टक्के हिंदू बांधवांविरोधात धमकीची भाषा वापरण्यात आली असून, “त्यांना संपवण्यासारखे” गंभीर वक्तव्य केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.



