मुंबई-सोलापूर विमान सेवेला सुरुवात!…

mumbai – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर येथे ‘मुंबई-सोलापूर विमान सेवे’चा शुभारंभ संपन्न झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस सोलापूरकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आणि अडथळ्यांवर मात करत आज विमानसेवेचा शुभारंभ झाला आहे. शहराचा विकास आणि रोजगारासाठी तसेच नवीन उद्योगांसाठी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवाई सेवा. आज मोठ्या प्रमाणावर निर्यात सुरू आहे आणि आपण जागतिक बाजारपेठेशी जोडले जात आहोत, अशा परिस्थितीत विकास साधायचा असेल, तर कार्यक्षम (functional) विमानतळ आणि चांगली हवाई जोडणी असणे अत्यावश्यक आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सोलापूर हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्चाचा जिल्हा, या जिल्ह्याच्या जवळपासच्या परिसरात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत, पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, सोलापूरला सिद्धरामेश्वर, तुळजापूरला आई तुळजाभवानी, अशा पवित्र स्थळांना जोडणाऱ्या भागात हवाई सेवा अत्यावश्यक म्हणून हे विमानतळ सुरू करण्याचा निर्धार आम्ही केला, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात हवाई सेवांचे महत्त्व ओळखून ‘उडान योजना (RCS)’ सुरू केली. सोलापूरसाठी आम्ही ‘वायबिलिटी गॅप फंड’ तयार केला. मुंबईशी हवाई जोडणी ही सर्वात महत्त्वाची होती, कारण मुंबईला जोडले की संपूर्ण जगाशी जोडले जातो. आज सोलापूरहून प्रत्यक्ष विमानसेवा सुरू झाली आहे. काही वेळातच मुंबईहून विमान सिद्धरामेश्वराच्या नगरीत उतरणार आहे. या पहिल्या उड्डाणाचा साक्षीदार होण्याचा मला अतिशय आनंद आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
याआधी सोलापूरला आयटी पार्क उभारण्याची घोषणा केली होती, मात्र त्यासाठी फंक्शनल विमानसेवा अत्यावश्यक आहे, आता विमानसेवा सुरू झाल्याने आयटी पार्क सोलापूरमध्ये उभारणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री प्रताप सरनाईक, स्टार एअरचे संजय घोडावत व इतर मान्यवर उपस्थित होते.