editorial

पावसाचे रौद्ररूप आणि महाराष्ट्र!…

गेल्या आठवड्याभरात महाराष्ट्रात जो पाऊस कोसळला. त्या पावसात अनेक ठिकाणी शेतातली माती भरलेल्या पिकासह वाहून गेली. शेतकऱ्यांच्या हाता, तोंडाशी आलेले पिक पावसाने नेले त्याच बरोबर गावागावात पाण्याचा महापूर लोटला. नदीकाठची गावे अक्षरशः जलमय झाली, जणू गावाने जलसमाधी घेतली असावी. इतका भयंकर पूर आलेला होता. अजूनही अनेक तालुके, गावे पाण्याखाली आहेत. शेत जमिनी बरोबर घरादारातील आयुष्यभर जमवलेल्या जीवनावश्यक वस्तू, फर्निचर सर्वकाही या पावसात वाहून गेले. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे राहिले! अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. गुरे ढोरे, मुले बाळे, वृक्ष पिके पुराच्या पाण्यात वाहून जाताना शेतकऱ्यांनी पाहिली. नऊ महिने पोटात जपलेल्या मुलाला वाहून जाताना पाहिल्यावर एका आईची अवस्था कशी होते, हे सुद्धा ह्या पावसाने दाखवले. इतका विचित्र पाऊस बरसला. इतरवेळी हवाहवासा वाटणारा पाऊस आता शेतकरी मायबापांना नकोसा वाटू लागला आहे. आता कर्ज कसे फेडणार, वाहून गेलेल्या वस्तू, फर्निचर, मुलांची वह्या, पुस्तके, कपडे, कागदपत्रे हे पुन्हा कसे मिळवायचे, कमवायचे हा गंभीर प्रश्न आता शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभा आहे. त्यात पडलेले घर पुन्हा कसे बांधायचे, उभारायचे? या विचाराने शेतकरी बांधव आपले उर, डोके बडवत आहेत. त्यांच्या बायका भर पावसात ढगफुटी झाल्याप्रमाणे आसवे गाळीत आहेत. अशी अवघड परिस्थिती आज महाराष्ट्राची आहे.

दरम्यान, या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आता सत्ताधारी, विरोधी असे दोन्हीकडची नेते मंडळी मराठवाड्यात येत आहेत. परंतु अनेक ठिकाणी या नेते मंडळींना विरोध होताना दिसत आहे. कारण शेतकऱ्यांच्या मते आम्हाला मदत हवी, पाहणी करून काहीच होणार नाही. गरज आहे ती तातडीने मदतीची. कोणताही पंचनामा न करता तात्काळ मदत करा, ओला दुष्काळ जाहीर करा असे बहुतांश शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. खरंतर इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांना थोडा बहुत दिलासा मिळेल यादृष्टीने थोडीतरी मदत आता करायला हवी. पण असे होताना दिसत नाहीये.

यावर्षी इतका प्रलयंकारी पाऊस पडला आहे कि, पुढे जाऊन राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करेलही पण इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस का पडला? सप्टेंबर महिना संपत आला तरीही पाऊस कमी होण्याचे नाव का घेत नाहीये? यावर देखील चर्चा आणि संशोधन होणे गरजेचे आहे. पाऊस तर हवा पण इतकाही नको कि मायबाप शेतकरी पार देशोधडीला लागेल. त्यामुळे अशा पडणाऱ्या पावसावर अभ्यास होणे गरजेचे आहे.

पूर्वी हिमालय क्षेत्रात असा ढगफुटीचा पाऊस पडत होता आजही पडतो परंतु महाराष्ट्र राज्यातही आता ढगफुटी सदृश्य पाऊस पडू लागला आहे. हे सर्व हवामानाच्या बदलामुळे तर घडत नाही ना? याचा शोध घेणे गरजेचे आहे. या पावसामुळे शेतातली माती पूर्णपणे वाहून गेली आहे. जमिनीची धूप कशी होते, हे आपण आज प्रत्यक्षात पाहत आहोत. पुढच्या काही वर्षात पूरग्रस्त भूमीवर पीक येईल कि नाही याची शाश्वती देता येत नाही. दरम्यान, सर्वांनी पर्यावरण विषयावर एकत्र येण्याची गरज आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन, आपल्याला मानवी भवितव्याकरता काय करता येईल याचा विचार सत्ताधारी, विरोधी पक्ष आणि जनतेने करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page