पूर्वजांना श्रद्धांजली वाहणारा पितृपक्ष पंधरवडा…

आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना मानवंदना देण्याकरता हिंदू धर्मात पितृपक्ष पंधरवडा साजरा केला जातो. आपापल्या पूर्वजांची मृत्यू पावल्यावर जी तिथी होती. त्या तिथीला पितरांचा दिवस प्रत्येक घरात पाळला जातो. माणसाच्या आयुष्यात परमेश्वराला अनन्य साधारण महत्व आहे. त्याचप्रमाणे माणसाने स्वतःच्या पूर्वजांना न विसरता श्रद्धापूर्वक नमन करावे, त्याकरता हा दिवस पाळला जातो. ज्यांच्यामुळे आपण या जगात जन्माला आलो. त्या पुण्यवंशी पितराचे स्मरण आपण करावे म्हणून हा पंधरवडा दरवर्षी केला जातो. या दिवशी पंचपक्वानांचा नैवेद्य पितरांना दाखवला जातो. तो नैवेद्य कावळ्याने खाल्ल्यावर घरातले नातेवाईक, मित्र एकत्र बसून भोजन करतात. या भोजनाच्या निमित्ताने आपले नातेवाईक, मित्र एकत्र येतात, म्हणून हा दिवस अधिक महत्त्वाचा आहे. अनेक जण आपापल्या नातेवाईकांना, मित्रांना या पंधरवड्यात घरी बोलवतात. म्हणजे कुटुंब, समाजाला एकत्र बांधणारा हा पितृपक्ष आहे असे आपण म्हणू शकतो.
दरवर्षी हा पितृपक्ष भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष तिथीला पौर्णिमेपासून सुरू होतो. पुढे पंधरा दिवसानंतर अश्विन महिन्यात कृष्ण पक्ष तिथीला म्हणजे अमावस्येला समाप्त होतो. या दिवसात दुसरे कोणतेही शुभकार्य केले जात नाही. आपल्या पूर्वजांचे सर्वांनी पूजन करावे, हा हेतू या पंधरा दिवसा मागचा आहे. स्वभावता माणसे सहजपणाने आपल्या पूर्वजांचे स्मरण करणार नाहीत. म्हणून हिंदू वैदिक शास्त्रात हा पितृपक्ष पंधरवडा सांगितला गेला आहे. या दिवसात हिंदू धर्माने कावळा या पक्षाला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. असे म्हटले जाते की निसर्गतः कावळ्याला या दिवसात पुरेसे अन्न मिळत नाही. म्हणून पितरांचे पिंडदान करतानाचा नैवेद्य कावळ्याला देण्यात येतो. हिंदू धर्मात कावळ्याविषयी अशी मान्यता आहे. मृत्यू झालेल्या किंवा आपल्यापासून दूर गेलेल्या पूर्वजांचा आत्मा हा कावळ्यात असतो. म्हणून कावळ्यांचा आत्मा शांत केला जातो. यंदा हा पितृपक्ष पंधरावडा ७ सप्टेंबर २०२५ रोजी सुरू होणार असून, तो २१ सप्टेंबर २०२५ या दिवशी समाप्त होणार आहे. ज्या व्यक्तीला, नातेवाईकांना आपल्या पूर्वजांची तिथी माहित नसते, त्यांच्यासाठी शेवटच्या दिवशी सर्वपित्री अमावस्या असते. असे हे पंधरा दिवस असतात.
हिंदू धर्मग्रंथांच्या मान्यतेनुसार पितृपक्षात पिंडदान, तर्पण, पूजा, धूपदान, अन्नदान तसेच इतर दानधर्म केल्याने माणसाला पुण्याची प्राप्ती होते. यातून घराघरात शांती, समाधान, प्रसन्नता, चैतन्य निर्माण होऊन, माणसाचे जीवन सुखी, आनंदी, उत्स्फूर्त होत जावे याकरता हा पितृपक्ष पंधरावडा तयार केला आहे. ह्या पितृपक्षात वनस्पती पूजनालाही महत्व प्राप्त करुन दिले आहे. त्यानुसार काही वनस्पतींच्या पूजनामुळे किंवा त्यांची रुजवन केल्यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होतात असे सांगितले गेले आहे. या दिवसांमध्ये पिंपळ या वृक्षाचे पूजन होते. पिंपळ हे वृक्ष अतिप्राचीन मानले जाते. आपल्या पितरांचा या वृक्षात आदिवास असावा, यामुळे पिंपळाचे पूजन व त्याचे रोपण केले जाते. दुधासोबत काळे तीळ त्याला वाहिले जातात. त्याचप्रमाणे बरगद वृक्ष, तुळस वनस्पती यांचे देखील पूजन सांगितले गेले आहे. आपल्या सर्व सण उत्सवात तुळस या वनस्पतीला पवित्र मानले गेले आहे. तुळस ही जीवन देणारी वनस्पती आहे म्हणजे ऑक्सिजन हे आपले जीवन आहे व तुळशीमुळे माणसाला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. या सर्वातून खऱ्या अर्थाने पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो म्हणून हा पितृपक्ष पंधरावडा दरवर्षी करावा. जरी आपण पावन गंगेत किंवा गोदावरीत आपल्या पूर्वजांचे पिंडदान केले असले, तरी देखील घरी आपण पितर घालावे. आर्याकडून ही हिंदू धर्म संस्कृती निर्माण झाली आहे. आर्यांनी आपल्या जीवनात निसर्ग पूजनाला महत्त्व दिले होते. त्यामुळे आपल्या प्रत्येक सणांमध्ये प्राणी, पक्षी वनस्पतींचे पूजन दिसून येते.
युवराज डी. सुर्ले…

